नंदुरबारमध्ये ९ कोटींच्या कथित निधी गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा

माजी मंत्री डॉ. गावीत यांच्या नावाचा कथित गैरवापर;  शासकीय निधी वळविल्याचा आरोप

अमळनेर (प्रतिनिधी)  नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी व मंदिरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ९ कोटी रुपयांच्या शासकीय विकास निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यासह चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहर भाजप कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहेरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा क्रमांक ६६५/२०२६ दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६१, ३१८ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३६ (४), ३३८ व ३४० अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या कार्यकाळात २०२२ ते २०२४ या कालावधीत विविध विकासकामांसाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला होता. मात्र, डॉ. गावीत आजारी असताना त्यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड व बनावट स्वाक्षऱ्या तयार करून मंत्रालयात शुद्धीपत्रके सादर करण्यात आली. त्याद्वारे मूळ शासन निर्णयात बदल करून सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी इतर कामांकडे वळविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी, अकाउंटंट किशोर तुळशीराम पाटील (रा. रनाळे) तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत वळविण्यात आलेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी रुपयांची कामे कै. हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान व सभागृहासाठी मंजूर करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

शिरीष चौधरींसह आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध; १६ जुन्या गुन्ह्यांचाही उल्लेख

 

पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वी खूनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी स्वरूपाचे एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या काही सहकाऱ्यांविरुद्धही विविध गुन्हे नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भट्ट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *