
पूराच्या जखमा ताज्याच, त्यात पाण्यासाठी वणवण; ‘पिण्याचे पाणी जीवनावश्यक नाही का?’
माजी नगरसेवक संदीप घोरपडे यांनी उपस्थित केला संतप्त सवाल

अमळनेर (प्रतिनिधी) : महापुराच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमळनेरकरांसमोर आता पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सजग नागरिक संदीप घोरपडे यांनी केली आहे. तसेच, “पिण्याचे पाणी जीवनावश्यक नाही का?” असा थेट आणि संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यातील नागरिक अनेक वर्षांपासून विविध मूलभूत समस्यांना तोंड देत आहेत. शेतकऱ्यांना शिवार रस्त्यांचा अभाव, अपुरी सिंचन व्यवस्था, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे शहरातील नागरिकही दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांमुळे त्रस्त आहेत. मात्र, या समस्यांवर अपेक्षित वेगाने उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. अलीकडेच झालेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य, वाहने आणि अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या संकटातून नागरिक सावरत असतानाच शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
नागरिक नियमितपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतानाही वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. “नागरिकांची अपेक्षा फार मोठी नाही. फक्त नियमित आणि वेळेवर पिण्याचे पाणी मिळावे, एवढीच रास्त मागणी आहे. मात्र तीदेखील पूर्ण होत नसेल, तर प्रशासन, यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व वाटते का?” असा प्रश्न संदीप घोरपडे यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी प्रशासनाच्या माहिती व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपत्तीच्या काळात विविध माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात. मात्र, कोणत्या प्रभागात पाणी कधी येणार, किती वेळ येणार आणि पुढील पुरवठा कधी होणार याबाबतची स्पष्ट माहिती नागरिकांना दिली जात नसल्याने संभ्रम आणि नाराजी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरपालिकेकडे आवश्यक यंत्रणा आणि प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध असतानाही नियोजनाचा अभाव किंवा प्रभावी समन्वय नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही नगरसेवक नागरिकांच्या संपर्कात असले तरी अनेक भागांमध्ये लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील दरी वाढत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
संदीप घोरपडे यांनी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करताना प्रत्येक प्रभागासाठी पाणीपुरवठ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि किती कालावधीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे, याची स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात यावी. तसेच पाण्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ थांबवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने व पारदर्शकपणे काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
“पिण्याचे पाणी ही सुविधा नव्हे, जीवनावश्यक गरज”
“पिण्याचे पाणी ही केवळ सुविधा नसून प्रत्येक नागरिकाची जीवनावश्यक गरज आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये आणि त्यांना वेळेवर माहिती मिळावी, एवढीच अपेक्षा आहे,” अशी भावना संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या प्रश्नांना आणि मागण्यांना आता प्रशासन व लोकप्रतिनिधी काय उत्तर देतात, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply