
अमळनेरच्या वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीसाठी डीपीडिसीतून ९६ लाखांचा निधी प्राप्त
आमदार अनिल दादा पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

अमळनेर (प्रतिनिधी) : अतिवृष्टी व बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे ३१ जुलै रोजी वाहून गेलेल्या अमळनेर शहराच्या मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीडिसी) ९६ लाख रुपयांचा निधी अमळनेर नगरपालिकेला प्राप्त झाला आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अमळनेरकर जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरी नदीपात्रात पुलाखाली असलेली शहराच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अमळनेर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे शहरवासीयांसमोर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. जलवाहिनी पुन्हा टाकण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. मात्र, नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने निधी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील अमळनेर येथे आले असता आमदार अनिल दादा पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. जलवाहिनीच्या पुनर्बांधणीसाठी डीपीडिसीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी दोन्ही मंत्र्यांकडे केली होती. आमदार अनिल दादा पाटील यांच्या मागणीला दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नगरपालिकेच्या वतीने खाजगी ठेकेदारामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल २२ दिवसांचा कालावधी लागला. अखेर २२ ऑगस्ट रोजी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शहराची पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. जलकुंभ भरल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर अमळनेरकरांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात झाली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून दिली माहिती
जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामासाठी डीपीडिसीतून ९६ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून दिली. निधी प्राप्त झाल्याची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अमळनेरकर जनतेच्या वतीने जाहीर आभार मानले. महापुरामुळे विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध झाल्याने अमळनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply