अमळनेरच्या श्री अंबरीषजी ऋषि महाराज टेकडीवर आज द्वादस यात्रा, जय्यत तयारी

अमळनेर (प्रतिनिधी )प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर नगरीतील पवित्र श्री अंबरीषजी ऋषि महाराज टेकडीवरील द्वादस यात्रा रविवारी, दि. २६ जुलै २०२६ रोजी आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी उत्साहात साजरी होत आहे. द्वादस तीर्थक्षेत्र श्री अंबरीषजी ऋषि महाराज मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुपच्या वतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी तसेच यात्रोत्सव सुरळीत व भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. अवघ्या काही तासांच्या या यात्रेचा आनंद लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच लाभत असून, ही यात्रा भक्तांसाठी आनंदाची पर्वणी मानली जाते.

पौराणिक परंपरेनुसार श्री अंबरीषजी ऋषि महाराज हे मोठ्या कुलघराण्यातील सोळावे गादीपुरुष राजा होते. हिमालयात कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील टेकडी परिसरातील विस्तीर्ण पठारावर जपतप करून श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे हा परिसर पवित्र, पावन आणि आध्यात्मिक ऊर्जा लाभलेले तीर्थक्षेत्र बनल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे.

पर्यावरण संवर्धनाचा वसा जपत टेकडी ग्रुपने गेल्या काही वर्षांत टेकडी परिसरात पाच हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. श्रमदान आणि लोकसहभागातून पाणीसाठ्यासाठी चर खोदणे, ड्रमच्या साहाय्याने प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचविणे, उन्हाळा व हिवाळ्यात वृक्षांची नियमित निगा राखणे अशी विविध कामे सातत्याने केली जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता राखण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. नाश्ता किंवा जेवणानंतर उरलेले अन्न, कागद, प्लास्टिक, वापरून फेकायच्या वस्तू किंवा इतर कचरा परिसरात न टाकता स्वतःसोबत आणलेल्या पिशवीत जमा करून टेकडी ग्रुपच्या सदस्यांकडे द्यावा किंवा मंदिराजवळील निर्धारित कचरा संकलनस्थळी टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच टेकडी परिसरातील वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी वाहने टेकडीच्या पायथ्याशीच उभी करावीत, पायी जाताना नव्याने लावलेल्या वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच परिसरातील पाण्याचे डबके अथवा साचलेल्या पाण्याजवळ जाणे किंवा त्यात उतरणे टाळावे, असेही आवाहन श्री अंबरीषजी ऋषि महाराज मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. भक्ती, अध्यात्म, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारी श्री अंबरीषजी ऋषि महाराज टेकडीवरील द्वादस यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *