“नगराध्यक्षांचा ‘दर्शन लाभ’ दुर्मिळ; खुर्ची झाली लोकप्रतिनिधी!”

‘नगराध्यक्ष भेटत नाहीत, मग नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?’

नगराध्यक्षांच्या खुर्चीलाच निवेदन चिटकवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन करीत सर्वसामान्यांचे वेधले लक्ष

 

अमळनेर (प्रतिनिधी)  नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर हे वारंवार नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात अनोखे आंदोलन केले. नगराध्यक्षांची भेट न मिळाल्याने त्यांच्या दालनातील खुर्चीलाच निवेदन चिटकवून आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. लोकनियुक्त नगराध्यक्ष नागरिकांना वेळ देत नसल्याने विकासकामांचे निर्णय रखडत असून सर्वसामान्यांच्या समस्या दिवसेंदिवस प्रलंबित राहत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश रविंद्र (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक, महिला आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क करूनही भेट मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यावर निर्णय घेणे ही प्राथमिक जबाबदारी असताना नगराध्यक्ष भेटीसाठी उपलब्ध नसल्याने नगरपरिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

 

अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटारांच्या कामांची मागणी, प्रश्न प्रलंबित राहिल्याने संताप

 

आंदोलनादरम्यान नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, सुसज्ज शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, काँक्रीट पार्किंग, बोअरवेल, कायमस्वरूपी पाणीपुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, आकर्षक लँडस्केपिंग तसेच धार्मिक भजने व शांती मंत्रासाठी ध्वनीप्रणाली उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.  तसेच प्रभाग क्रमांक ३ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासोबत आवश्यक गटारांचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली. अशोक बाबुलाल सोनवणे यांच्या घरापासून बापू सोमा भोई यांच्या घरापर्यंत तसेच दीपक रमेश भिल यांच्या घरापासून कलाबाई माधुकर पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधण्यात यावे, जेणेकरून पावसाचे व सांडपाण्याचा योग्य निचरा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण (गुड्डू) संताजीराव देशमुख, दुर्गेश रविंद्र (डी.पी.) पाटील, भूषण लोहार, चेतन पवार, चेतन पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ललित पाटील, कुशल पाटील, विवेक निकुम, अविनाश कुंभार, चिन्मय पाटील, मोहित शिंदे, सतीश पाटील, शरद पाटील, हर्षल शिंपी, मनीषा पाटील, कोमल पाटील, शोभाबाई मिस्तरी, ठगूबाई मराठे, राजश्री धनगर, भिकूबाई कोळी, ज्योती कुंभार, पार्वती मिस्तरी, ममताज रफिक, ऊषाबाई इदोरे, मंगळबाई पाटील, कलाबाई पाटील, मीनाक्षी पाटील, बापू सोमा भोई, सागर लांडगे, जिग्नेश पाटील, विशाल धनगर, हर्षल पाटील, जयेश पाटील, मनीष पाटील आणि पंकज पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन

 

यावेळी दुर्गेश रविंद्र (डी.पी.) पाटील यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीचा अवमान करण्यासाठी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. नगराध्यक्षांनी नागरिकांसाठी नियमितपणे उपलब्ध राहून विकासकामांबाबत निर्णय घ्यावेत. अन्यथा अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटाराच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

अमळनेर शहर अंधाराच्या विळख्यात; अनेक भागांतील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद

 

अमळनेर शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण शहर रात्री अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे नागरिकांना रात्री ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघात व चोरीसारख्या घटनांची भीतीही वाढली आहे. संबंधित विभागाने तातडीने बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू करून शहरातील प्रकाश व्यवस्था सुरळीत करावी, अशी नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी चे सरचिटणीस प्रविण(गुड्डू )संताजीराव देशमुख यांनी मागणी केली आहे.

 

आंदोलनकर्त्यांच्या या आरोपांचे नगराध्यक्ष धनी

 

नागरिकांना वारंवार भेट मिळत नसल्याने कामे कामे आणि समस्या खोडंबल्या.

• विकासकामांच्या निर्णयांना विलंब होत असल्याची तक्रार.

• प्रभागातील मूलभूत सुविधा प्रलंबित असल्याचा दावा.

• अमरधामच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव रखडल्याची नाराजी.

• गटारांसह स्थानिक विकासकामांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी.

“अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद; शहर अंधाराच्या विळख्यात!”

• मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *