
अमळनेर तालुक्यात दुर्दैवी घटनांची मालिका; विहिरीत बुडून दोघांचा, तर गळफासाने एकाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील इंद्रापिंपरी व धार येथे विहिरीत बुडून दोघांचा तर बहादरपूर रोडवरील अमलेश्वर नगर येथे एका व्यक्तीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, इंद्रापिंपरी येथील शेतकरी बन्सीलाल भटा पाटील (वय ५५) हे दि. १४ जून रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत होते. यावेळी ते कावपिंपरी येथील विठ्ठल निंबा पाटील यांच्या विहिरीजवळ गेले असता अचानक तोल जाऊन विहिरीत पडले. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र त्यांना बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, धार येथील रईस कमरोद्दीन मुजावर (वय ४४) हे दि. १५ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शफीक अब्दुल हमीद यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत तरंगताना आढळून आले. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत. तर तिसऱ्या घटनेत, बहादरपूर रोडवरील अमलेश्वर नगर येथील सचिन साखरलाल महाजन (वय ३४) यांनी दि. १४ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी गजाला दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.
या तिन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply