नगरपालिकाकडून पाणीपट्टीसाठी तगादा, मात्र नळाला ७ महिन्यापासून पाण्याचा थेंब नाही

गणेश कॉलनी भागातील तीन रहिवाशांची कैफियत

 

अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेकडून पाणी पट्टी वसुलीसाठी तगादा लावत जात असतानाच दुसरीकडे मात्र गणेश कॉलनी भागातील तीन रहिवाश्यांच्या नळाला गेल्या सात महिन्यांपासून पाण्याचा थेंब देखील आलेला नाही. त्यामुळे या नागरिकाना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नियमित करभरणा करूनही अशी अवस्था असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे रोड वरील जिप विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या गणेश कॉलनीतील सुधाकर देशमुख, प्रवीण रामदास पाटील आणि अरविंद मुंडके या तिन्ही नागरिकांच्या घरी नळांना पिण्याचे पाणीच मिळत नाही. गेल्या सात महिन्यांपासून त्यांनी वारंवार तक्रारी करून देखील उपाययोजना होत नाही. नागरिकाना शेजारी पाजारींकडून पिण्याचे पाणी मागावे लागते. त्यामुळे त्यांची धावपळ होते आणि त्रासदायक होते. मूलभूत सुविधाच पालिकेकडून मिळत  नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.  मात्र पालिकेचे वसुली कर्मचारी  नियमित वसुलीसाठी तगादा लावत आहेत. कर्मचाऱयांनी अनेकदा खोदून देखील दोष आढळला नाही.

 

मुलभूत सुविधा पुरवणे गरजेचे

 

आम्ही पालिकेचे नियमित कर भरणा करतो. त्यामुळे पालिकेने मूलभूत सुविधा पुरवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा.

सुधाकर देशमुख, रहिवाशी

 

कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना

 

पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना तांत्रिक दोष शोधायला सांगितले आहे. तातडीने दुरुस्ती काम लावून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करतो.

कैलास पाटील ,सभापती पाणी पुरवठा अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *