अल्पसंख्यांक मुलगी प्रकरणी न्यायासाठी ‘एकता संघटने’चा इशारा; कठोर कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील एका अल्पसंख्यांक मुलीला संगनमत करून पळवून नेल्याच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी जळगाव जिल्हा एकता संघटनेने ठाम भूमिका घेत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका कुटुंबाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. या अन्यायाविरुद्ध ठोस लढा उभारला जाईल,” असा इशारा संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीच्या भावाने २३ मार्च २०२६ रोजी मारवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, संबंधित मुलगी घरातून जाताना गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची चैन आणि लग्नातील ६० हजार रुपये रोख रक्कम घेऊन गेली आहे. हा प्रकार केवळ प्रेमप्रकरण किंवा पळून जाण्यापुरता मर्यादित नसून संगनमताने केलेले अपहरण, फसवणूक आणि चोरी असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी केवळ ‘मिसिंग’ तक्रार नोंदवून घेतल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फारुक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मुलीचा तात्काळ शोध घेऊन तिला कुटुंबाच्या ताब्यात द्यावे, संशयित आरोपी राकेश अनिल पाटील याच्याविरुद्ध अपहरण व चोरीचे गुन्हे दाखल करावेत आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत दोन दिवसांत सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी हाजी नासिर, नगरसेवक नविद शेख, ॲड.  साजिद शेख, व्ही. एम. मुजावर, अजहर अली, गुलाम नबी पठाण, समीर मुजावर (फिर्यादी) यांच्यासह मोठ्या संख्येने समाजसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही आणि दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही एकता संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *