
अमळनेरात २२ ते २५ मार्च दरम्यान ‘मतदार मॅपिंग’ मोहीम; बीएलओंना पूर्णवेळ कामाचे दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, २२ ते २५ मार्च दरम्यान तालुक्यात ‘मतदार मॅपिंग’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत तालुक्यातील सर्व बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांना नियमित कामकाजातून कार्यमुक्त करून पूर्णवेळ मतदार मॅपिंगचे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनःरीक्षण कार्यक्रमास १ एप्रिलपासून सुरुवात होणार असून, त्याआधी मतदार यादीतील त्रुटी दूर करून अद्ययावत माहिती संकलित करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व मॅपिंगचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान बीएलओ घराघरात भेट देऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. नव्याने पात्र ठरणाऱ्या मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता, वय आदी माहितीतील दुरुस्त्या करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मतदारांची अचूक माहिती संकलित करून मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्याचा उद्देश प्रशासनाचा आहे.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादीतील त्रुटी कमी होऊन आगामी निवडणुका अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली आहे. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply