
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा; चार उपसमित्या केल्या स्थापन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची पहिली सभा संघाच्या मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या प्रशासनाला अधिक गतिमान, पारदर्शक व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच विविध विभागांचे कामकाज प्रभावी करण्यासाठी चार स्वतंत्र उपसमित्यांची स्थापना करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी नवनियुक्त प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील व व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे यांचा संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित संचालकांनी दोघांचे अभिनंदन करत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षम, पारदर्शक व शेतकरीहिताचे निर्णय घेणारी संस्था म्हणून पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. बैठकीत एकूण सहा विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले. दि. १० जून २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. तसेच दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीतील मुख्य कार्यालयाचा जमाखर्च संचालक मंडळासमोर सादर करण्यात आला. उत्पन्न, खर्च व आर्थिक व्यवहारांचा आढावा घेतल्यानंतर हा जमाखर्चही एकमताने मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ अन्वये संचालक मंडळाचे बंधपत्र तयार करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दि. १९ जून २०२६ रोजी प्रेसिडेंट यांना संस्थेच्या वतीने सह्यांचा अधिकार देण्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकासही सभेने मंजुरी दिली.
संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार व पारदर्शक व्हावे, निर्णय प्रक्रिया गतिमान व्हावी आणि विविध विभागांवर प्रभावी देखरेख राहावी या उद्देशाने शेतकी विभाग, जिन विभाग, नोकर नियंत्रण विभाग आणि शासकीय धान्य खरेदी विभाग अशा चार स्वतंत्र उपसमित्यांची स्थापना करण्यात आली. या उपसमित्यांमार्फत संबंधित विभागांचे नियोजन, अंमलबजावणी, आर्थिक शिस्त आणि शेतकरीहिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबविले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सभेच्या शेवटी आयत्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. संघाचे आधुनिकीकरण, आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन, सभासद-केंद्रित सेवा आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत संघाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्व संचालकांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी संस्थेचा आर्थिक व प्रशासकीय लेखाजोखा, विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा, प्रलंबित कामे, आगामी नियोजन तसेच प्रस्तावित उपक्रमांची माहिती संचालक मंडळासमोर मांडली. संचालकांनी या सादरीकरणाचे समाधान व्यक्त करत अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व शेतकरीहिताला प्राधान्य देणारे प्रशासन राबविण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.
स्थापन करण्यात आलेल्या उपसमित्या
शेतकी विभाग उपसमिती : चेअरमन – सुषमा वासुदेव देसले, सदस्य – संजय पुनाजी पाटील, मालुबाई बापूराव पाटील, सचिन बाळू पाटील, सुरेश पिरन पाटील, आमंत्रित सदस्य – प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे.
जिन विभाग उपसमिती :
चेअरमन – रणजीत भीमसिंग पाटील, सदस्य – संजय पुनाजी पाटील, विक्रांत भास्कर पाटील, जितेंद्र दिनकर पाटील, मालुताई बापूराव पाटील, आमंत्रित सदस्य – प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे.
नोकर नियंत्रण उपसमिती :
चेअरमन – शंकर बंडू बैसाणे, सदस्य – नितीन बापूराव पाटील, श्याम साहेबराव पवार, सचिन बाळू पाटील, प्रफुल्ल हिरालाल पवार, आमंत्रित सदस्य – प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे.
शासकीय धान्य खरेदी उपसमिती :
चेअरमन – विक्रांत भास्कर पाटील, सदस्य – संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, सुभाष सुकलाल पाटील, नितीन बापूराव पाटील, आमंत्रित सदस्य – प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे.

Leave a Reply