
अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; २५० कलाकारांनी उभा केला इतिहास
अमळनेर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले. यातून २५० कलाकारांनी इतिहास उभा केला. संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महानाट्याच्या दोन्ही प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयनिल फाऊंडेशनच्या वतीने सकाळी १० वाजता महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. यावेळी प.पू. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते जयनिल फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, जितेंद्र ठाकुर, रिता बाविस्कर, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी संत प्रसाद महाराज यांनी आशीर्वचन दिले, तर आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे युवकांसाठी विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला. जयनिल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून काम केले जाईल.” संस्कृती फाऊंडेशनचे निकेश राजपूत यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे आभार मानले.
८० टक्क्यांहून अधिक कलाकार अमळनेरमधील 
या महानाट्यात तब्बल २५० कलाकारांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे, त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक कलाकार अमळनेरमधील होते. कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः इतिहासाच्या काळात नेले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. महानाट्य समाप्तीनंतर अनेक प्रेक्षकांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसमोर नतमस्तक होत संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे कौतुक केले.

Leave a Reply