
ज्यूस प्यायला आलेल्याची मोटरसायकल लंपास; पोलिसांच्या तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील स्टेट बँकेसमोर ज्यूस प्यायच्या बहाण्याने मोटरसायकल चोरून नेल्याची घटना ५ तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निलेश हिम्मत संदानशीव यांनी त्यांची मोटरसायकल (क्रमांक एमएच १९ बीएल ६८७५) स्टेट बँकेसमोर असलेल्या ज्यूसच्या दुकानाजवळ उभी केली होती. त्यावेळी ज्यूस विक्रेत्याने घरातून चार्जिंग लाईट आणण्यासाठी मोटरसायकल मागितली. चावी मोटरसायकलमध्येच ठेवून तो ती सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना एक अनोळखी व्यक्ती तेथे आला आणि ज्यूस पिण्याची ऑर्डर दिली. त्यामुळे दुकानदार ज्यूस बनविण्यात व्यस्त झाला.
दरम्यान, निलेश संदानशीव मोटरसायकल परत घेण्यासाठी आले असता ती जागेवर दिसली नाही. संधी साधून अज्ञाताने मोटरसायकल चोरून नेल्याचे उघड झाले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू केली. तपासादरम्यान सैय्यद याकूब सैय्यद रेहमान (रा. चोपडा, सध्या मुक्काम चुनाघाणी, गंधलीपुरा) याने मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, सूर्यकांत साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, अमोल कर्डयीकर, राजेंद्र देशमाने आणि मयूर पाटील यांनी केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply