श्री मंगळग्रह मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात; रुद्राभिषेक, महापूजा व संगीतमय सुंदरकांड

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत श्री मंगळेश्वर पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीवर विशेष रुद्राभिषेक व महापूजा झाली.

अमळनेरमधील सुपरिचित भगवती टी स्टॉलचे संचालक बाळू अशोक पाटील व नगरसेविका छायाताई बाळू पाटील या दाम्पत्याच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. प्रारंभी गणपती पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री मंगळेश्वर पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीवर विधिवत रुद्राभिषेक करून हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली व पाळणा हलवत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ आणि ‘संकटमोचन हनुमानजी की जय’ अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

यानंतर धूप, दीप व नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या विधींसाठी श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, पवन शर्मा व उमेश पाठक यांनी सहकार्य केले.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी पुषंद ढाके यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिरात संगीतमय सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *