
अमळनेरचा लाडका लाल ‘खबरीलाल’ पुन्हा जोमाने सक्रीय…
अमळनेरच्या मतदारांनी दिलेल्या प्रेमाने मिळाली नवी उर्जा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे गेल्या दीड महिन्यापासून खबरीलालच्या बातम्या बंद ठेवल्याने प्रिय वाचकांची गैरसोय झाली. याचा खेद आम्हालाही आहे. त्यामुळे सुरवातीलाच वाचकांची दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे त्याच जोमात आणि त्याच धडाकेबाजपणे आपला लाल खबरीलाल सक्रिय होत आहे. या निवडणुकीत स्वत: नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवल्याने खबरीलालच्या वाचकांना न्याय देता येणार नव्हता. परंतु ही निवडणूक खूप काही शिकवून गेली, शहरातील प्रत्येक मतदार राजाला भेटता आले, नेेते भेटले, व्यापारी भेटले, जे-जे या प्रवाहात भेटले त्यांना भेटून आनंद झाला. माणसे कळली, कोण जवळचा, कोण आपला, कोण परका हे जवळून पाहता आले. वर तोंड करून गोड बोलणारे आणि खाली पाय कुचकरणारे पावलोपावली भेटले. ज्यांना आतापर्यंत जीव लावला, त्यांनीच जीव घेण्याचा आणि उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. ज्यांचे अनेकदा आश्रू पुसले त्यांनीच डोळ्यात आश्रू आणण्यास कोणतीही कसर सोडली नाही. यातूनच त्यांचा असुरीपणाही अधोरेखित झाला. पण अमळनेरच्या मतदारांनी दिलेले प्रेम नवी उर्जा देऊन गेली. आपणच कुठेतरी जनतेच्या सेवेत कमी पडलो. म्हणून अपयश आले असावे. पण हे अपयश पचवण्याची ताकदही याच जनतेच्या उत्साहातून मिळाली आहे. त्यामुळे यापुढेही जनतेची सेवा अधिक जोमाने करायची आहे. जनतेसाठी आजही दिवसरात्र काम करण्याची माझी तयारी आहे. तर या निवडणुकीने जसे चांगले अनुभव दिले, तसेच कटू अनुभवही अनुभवायला आले. हे अनुभव चिरकाल काळजात कोरले गेले. जे कधीच विसरू शकत नाही. सुरुवातीला वरवर करणे आपलेपणा दाखवणाऱ्यांनीच अधिक धोका देत विश्वासघात केल्याचाही अनुभव फार काही शिकवून गेला. जवळचे मित्र कळले. नातेगोते किती कामी आले ते कळले. आणि शहरातील महत्वाचा घटक असलेले व्यापारी, बिर्ल्डस कळले. अमळनेरची मतदार संख्या एक लाखाच्या जवळपास आहे. त्यातून २२ हजार मते मला मिळाली. ३० हजार मते विरोधकांना मिळाली. एकूण मतदार माझ्या सोबत होते. पण यात जवळपास १०० लोक विरोधात काम करीत होते. त्यामुळे त्यांनी रचलेल्या षडयंत्रणेमुळे मी त्यांचेही मनापासून आणि कोपऱ्यापासून आयुष्यभर आभारच मानणार आहे. तसेच अमळनेरच्या जनतेने जो कौल दिला आहे, तो माझ्यां नेत्यासंह आम्ही पूर्ण आदराने आणि नम्रतेने स्वीकारला आहेच. निवडणूक ही लोकशाहीची खरी ताकद असून, मतदार राजाने व्यक्त केलेला विश्वास आणि निर्णय आम्हाला सदैव मार्गदर्शक ठरेल. आमदार अनिल दादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबराव दादा पाटील, मा. नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची या काळात खंबीर साथ लाभली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व मतदार राजाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. जनतेच्या हक्कांसाठी, सत्यासाठी आणि न्यायासाठी आम्ही सदैव संघर्षरत राहू. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हीच आमची भूमिका राहील.
नाठाळाच्या माथी हाणू काठी…..
आता मी पत्रकारितेच्या माध्यमातून सक्रिय राहून जनसेवेचा वसा घेतला आहे. कोणाच्या काही अडीअडचणी असतील त्यांनी केव्हाही मला सांगाव्यात, त्या निश्चितच सोडवल्या जातील. निवडणुकीच्या कालावधीत विरोधकांनी लचके तोडणारा, तोडपाणी करणारा, असा चिखलफेक केला. तरी मी त्यांना उत्तर दिले नाही. मी शांत राहिलो. संयम ठेवला. हीच माझी या निवडणुकीतील खरी ताकद राहिली. मी षंड आहे, घाबरलो आहे, असा त्यांचा समजही झाला असेल, पण कर नाही त्याला डर कशाला म्हणून त्याचे उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटली नाही. कारण त्यांचे धंदे पण मला चांगलेचं माहिती आहेत. आणि पत्रकारिता करीत असताना काही ठरावीक आत्मे दुखावले गेले असतील. काही त्यात एखादा व्यापारी असेल, अधिकारी असेल, पांढरा बगळा बिर्ल्डस असेल पण हे चोरटे-भामटे लुच्चे लफंगे असल्यामुळे मी त्यांच्यावर पत्रकारितेच्या माध्यमातून आसूड ओढलाही असेल, त्यांची पापे उघड केल्यामुळे त्यांना त्रास झालाही असेल. पण असा एक मायचा लाल दाखवावा त्याची तोडपाणी मी केली, त्याचा लचका तोडला.. एक व्यापारी होता. त्याने गरीबांची रेशनची २० क्विंटल साखर खाल्ली होती. त्याला जेल मध्ये टाकले होते, तो म्हणायचा मला त्रास झाला आहे. एखादा बिल्डर असेल त्याने वाळू चोरून खाल्ली असेल यामुळे त्याला त्रास झाला असेल. असे ठराविकच चोट्टे अपप्राचर करीत होते. त्यातील आमचे काही पत्रकार बांधव त्यांना खतपाणी घालत होते. लचका तोडल्याची स्क्रीप्ट बनवून देत होते. लाचारीचीही काही हद्द असते हेच ते विसरून गेले होते.. पण त्यावर आम्हाला उत्तर द्यावेसे वाटले नाही. तर येणाऱ्या काळात त्यांना त्यांचे उत्तर व्याजासह दिले जाईल. “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी” अर्थ आणि भावार्थ: भले तर देऊ कासेची लंगोटी: आम्ही सज्जन, चांगले लोक असल्यास त्यांना आमच्या कमरेला असलेली लंगोटी (वस्त्र) देखील देऊ, म्हणजे आम्ही उदार आहोत. नाठाळाच्या माथी हाणू काठी: पण जे हट्टी, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्या डोक्यावर काठी (दंड) मारण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे तुकाराम महाराज सांगतात. या खबरीलालच्या ब्रीद वाक्याचा भविष्यात अनेकांना प्रत्यय निश्चित येईल. तुर्त ऐवढे…

Leave a Reply