अजितदादांनी कर्जाच्या अंधारातून दिला जीवनाचा आधार : आमदार अनिल पाटलांची भावूक साक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) सतत वेळ पाळणारे, शब्दाला जागणारे आणि संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीवर निर्धाराने हात ठेवणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. संपूर्ण महाराष्ट्राला वेदनेचा धक्का देणारे हे कार्य नियतीने केले असून, “आता आम्ही कोणाकडे बघायचे?” हा आर्त सवाल प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात १ रोजी सकाळी ९ वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृह शोकाकुल वातावरणाने भारले होते; डोळ्यांत अश्रू, मनात आठवणी आणि शब्दांत कृतज्ञता दाटून आली होती. या वेळी आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मनातील वेदना शब्दांत मांडताना उपस्थितांची मने हेलावून टाकली. “२०१६ मध्ये माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. मी भाजपचा असतानाही दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. तो आधार मिळाला नसता, तर कदाचित मी आत्महत्येच्या तयारीत होतो,” असे सांगताना त्यांचा आवाज गहिवरून गेला. संकटात पक्ष, मतभेद न पाहता माणूस म्हणून उभे राहणारे अजितदादांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, अमळनेर तालुक्याच्या विकास कायापालटात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आमदारांच्या समस्या ऐकून प्रत्येकाला भावासारखी वागणूक देत न्याय देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला गती देऊन आज जो पाणीसाठा उपलब्ध आहे, ती अजितदादांचीच देण असल्याचे भावूक शब्दांत सांगितले.

यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, डॉ. अविनाश जोशी, संजय पुनाजी पाटील, संदीप घोरपडे, डी. एम. पाटील, शिवाजी पाटील, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, भागवत पाटील, खा. शि. मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, वसुंधरा लांडगे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, सरपंच संघटनेतर्फे महेंद्र बोरसे, ॲड. शकील काझी, ॲड. तिलोत्तमा पाटील, मंगळ ग्रह मंदिरतर्फे दिलीप बहिरम, आम आदमी पार्टीतर्फे प्रा. गणेश पवार, नितीन भदाणे, इम्रान खाटिक, रिपाईतर्फे यशवंत बैसाणे, शिवसेनातर्फे महेश देशमुख, अनिल शिसोदे, मुन्ना शर्मा, अमित पाटील, प्रा. योगिता कापडणे आदींनी मनोगत व्यक्त करून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

शोकसभेचे आयोजन मराठा समाजाचे विक्रांत पाटील, संजय पाटील, भाजपचे शीतल देशमुख, उमेश वाल्हे, पत्रकार संघाचे चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे भूषण भदाणे, शेतकी संघाचे संजय पाटील तसेच सर्व पक्ष व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, बिपीन पाटील, ॲड. ललिता पाटील, सुलोचना वाघ, रिटा बाविस्कर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सुषमा देसले, प्रा. अशोक पवार, मुक्तार खाटीक, राजेंद्र देशमुख, श्याम पाटील, हेमंत पवार यांच्यासह विविध समाज संघटना, कर्मचारी, व्यापारी, कामगार, महिला मंडळे, शिक्षक संघटना, पत्रकार संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *