कर्जमाफी योजनेचे निकाल बदलून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा

जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष पाटील यांनी केली मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) शासन राबवत असलेली कर्जमाफी सदोष असून त्याचे निकष बदलवून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. यात नियमित शेतकऱ्यांना ५० हजार ते १ लाख रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष  पाटील यांनी जिल्हा बँक तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासन शेतकरी हिताची कर्जमाफी योजना राबवत असताना दरवेळी ठराविक शेतकरी थकबाकीदार राहून योजनेचा लाभ घेतात आणि प्रामाणिक शेतकरी प्रत्येकवेळी कर्ज भरत असतात. त्यामुळे ही कर्जमाफी सदोष असून त्याचे निकष बदलवून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. कारण ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्या आणि जिल्हा बँक या फक्त प्रामाणिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे तग धरून आहेत. दरवर्षी थकबाकीदार राहून प्रत्येकवेळी कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्यांमुळे आज सुमारे ५०० सहकारी संस्था लिक्विडेशन मध्ये आल्या आहेत. जर सर्वच शेतकऱ्यांनी कर्ज माफीच्या हेतूने कर्ज फेड करणे बंद केले तर या सर्व सहकारी संस्था कोलमडतील. शासनच आता शेतकऱ्यांना थकबाकीदार होण्यासाठी प्रवृत्त करत आहे. शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे निधी अभावी हा लाभ मिळलेला नाही. त्यामुळे नियमित शेतकऱ्यांना ५० हजार ते १ लाख रुपये अनुदान देण्यात यावे. अशा शेतकऱ्यांना भविष्यात शून्य टक्के व्याजासोबत कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात यावी , प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना राबवून खते, बियाणे किंवा विमा हप्त्यात सवलत योजना देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जर प्रामाणिक शेतकऱ्यांची अशीच उपेक्षा होत राहिली तर भविष्यात आम्हालाही कर्ज फेड रोखण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सुरेश पिरन पाटील, दिनेश पवार, कैलास पाटील, भालचंद्र शेलकर, प्रताप पाटील, सुनील पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *