
भटके विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार!
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील भटके विमुक्त जाती समन्वय समितीच्या वतीने नांदेडकर सभागृह येथे ३१ ऑगस्टचा ऐतिहासिक भटके विमुक्त हक्क आणि मुक्ती दिन सामाजिक प्रबोधन व चिंतनाने साजरा करण्यात आला. यावेळी भटके विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी संघटित होऊन मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांना केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ ऑगस्ट १९५२ रोजी जाचक गुन्हेगारी जमाती कायदा रद्द झाल्याने भटके विमुक्त समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत अमळनेर येथे समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासह विविध प्रश्नांवर चिंतन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक पवार व डी. ए. धनगर यांनी भटके विमुक्त समाजाच्या हक्कांसह शैक्षणिक प्रगतीवर आणि समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासावर भर दिला. समाजातील तरुण-तरुणींनी बदलत्या काळानुसार आधुनिक व कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केले. भटक्या विमुक्त जाती विकास हक्क परिषदेचे अमर कटोले यांनी शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, जातीचे दाखले, हक्काचे घरकुल आणि वसतिगृहांच्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भोई, सेवानिवृत्त अधिकारी सी. एस. वैद्य, माजी सिनेट सदस्य दिनेश नाईक, युवासेनेचे शहराध्यक्ष राहुल कंजर, विजय पाटील, एस. सी. तेले, प्रकाश ताडे, मुकेश परदेशी, बापू भोई, मनोहर सोनवणे, सुभाष जाधव, सामाजिक व शिक्षक कार्यकर्ते डी. ए. पाटील, वीरभूषण पाटील, दशरथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वासुदेव जोशी गोंधळी समाजाचे पदाधिकारी विलास दोरकर, नारायण शिंदे, रोहित भोपे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगणे, दिपक भोई आणि राहुल कंजर यांचाही सत्कार करून गौरव करण्यात आला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता सूत्रसंचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल भोई यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी भटके विमुक्त समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भविष्यात सामाजिक प्रश्नांवर एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply