अमळनेरात नवरात्रोत्सवाची धूम; ९० हून अधिक देवींची स्थापना, बाजारपेठेत पूजासाहित्याची रेलचेल

अमळनेर (प्रतिनिधी) आदिशक्ती दुर्गामातेच्या आगमनाने अमळनेर शहरासह तालुक्यात नवरात्रोत्सवाची रंगत वाढली आहे. शहरातील ५१ मंडळांसह ग्रामीण भागातही देवींची स्थापना करण्यात आली असून, मंदिरांमध्ये सजावट आणि विद्युत रोषणाईने उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. पूजासाहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून, नऊ दिवसांच्या उत्सवासाठी मंडळे आणि भाविक सज्ज झाले आहेत.

अमळनेर शहरात ४२ सार्वजनिक आणि ९ खासगी अशा एकूण ५१ ठिकाणी देवींची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे ४० ठिकाणी देवींची स्थापना झाली असून, संपूर्ण तालुक्यात सुमारे ९० ते ९५ सार्वजनिक देवींची स्थापना झाल्याची माहिती आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नारंगी रंगाच्या वस्त्रांनी सजलेल्या देवीची विधिवत घटस्थापना करण्यात आली. पुढील दिवसांत पांढरा, लाल, गडद निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, जांभळा आणि मोरपंखी अशा विविध रंगांच्या वस्त्रांनी देवीची आराधना केली जाणार आहे.

शहरातील वसई देवी मंदिर, पाचपावली देवी मंदिर, सप्तशृंगी माता मंदिर, तांबेपुरा, आर. के. नगर मंदिर, संतोषी माता मंदिर आणि पैलाड येथील भवानी माता मंदिरासह विविध मंदिरांमध्ये स्वच्छता, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. देवीच्या मूर्तींनाही आकर्षक साज चढविण्यात आला आहे.

 

पूजासाहित्य खरेदीसाठी गर्दी

 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खण, वेणी, कापूर, धूप, हळद-कुंकू, नारळ आणि विड्याची पाने यांसह विविध पूजासाहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत असून, दांडियाच्या विक्रीलाही सुरुवात झाली आहे. देवीच्या आगमनानिमित्त मंडळांकडून आकर्षक देखावे आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईवर भर देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात खाटूश्याम बाबांचे दर्शन घडविणारी आरास साकारण्यात येणार आहे.

 

दुष्काळाच्या सावटामुळे मूर्ती विक्रीत घट

 

यंदा पावसातील खंड आणि दुष्काळाच्या सावटामुळे देवीच्या मूर्तींच्या विक्रीत घट झाल्याचे मूर्तिकार किरण कुंभार यांनी सांगितले. आर्थिक परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेतील खरेदीवरही जाणवत आहे. असे असले तरी पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी शहरासह तालुक्यातील मंडळे आणि भाविक सज्ज झाले आहेत.

 

सुरक्षित उत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज

 

“नवरात्रोत्सव हा भक्तिभावाचा आणि आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. शहरात हा उत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, यासाठी अमळनेर पोलीस प्रशासन सज्ज आहे. शहरातील सर्व नवरात्र मंडळांच्या ठिकाणी पोलीस, होमगार्ड आणि महिला होमगार्ड कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महिला व मुलींनी रात्रीच्या वेळी एकट्याने फिरणे टाळावे. छेडछाड, अफवा आणि अनुचित प्रकारांवर पोलिसांचे लक्ष राहणार असून, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू वापरणे किंवा सोबत बाळगणे टाळावे. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. सर्व नवरात्र मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून उत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करावा,” असे आवाहन अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *