
लग्नसराईत गॅस टंचाईचा बसतोय फटका; पुन्हा लाकूडफाटा वापरून चुलीचा आधार
केटरर्स-हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे धाव घेत मंडली व्यथा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने केटरर्स व हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात गॅस उपलब्ध नसल्याने अनेक कार्यक्रम अडचणीत आले असून व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेरमधील केटरर्स व हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरण वेळेत न झाल्यास अनेक समारंभांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक असून त्याशिवाय व्यवसाय चालवणे अशक्य आहे. या क्षेत्रावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली असून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरचीही अशीच परिस्थिती असून सामान्य नागरिकांना लाईन लावूनही गॅस मिळत नसल्याचे चित्र आहे. काहींनी पुन्हा लाकूडफाटा वापरून स्वयंपाक सुरू केला आहे. यावेळी अमळनेर टेन्ट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, हॉटेल असोसिएशन अध्यक्ष मनीष जोशी यांच्यासह घनश्याम अग्रवाल, कैलास पाटील, राजूभाऊ शेटे, मनोज दीक्षित, कन्हैया सासनानी, बी.बी. जैन, विजय पाटील, गिरीश सराफ, चंदू परदेशी, मयूर चौधरी, अरुण नेरकर, अभिमान पाटील, शाम राणे, दिलीप यावले, अनिल चौधरी, सतू महाराज, विनोद पाटील, सुशील जैन, राजेंद्र मोरे आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉटेल व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत
“गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. सध्या सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले आहे.”
–मनीष जोशी, अध्यक्ष, हॉटेल युनियन, अमळनेर
व्यवसायला आर्थिक फटका
“लग्नसराईच्या हंगामात अनेक कार्यक्रमांची जबाबदारी घेतलेली असते. मात्र गॅस उपलब्ध नसल्याने कामे वेळेत पूर्ण करणे अवघड झाले असून आर्थिक फटका बसत आहे.”
– प्रवीण बडगुजर, अध्यक्ष, टेन्ट व केटरर्स युनियन, अमळनेर
लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न
“व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत माहिती घेतली जात असून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
– मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर

Leave a Reply