फोटोशॉपमध्ये बनावट बांधकाम परवानग्या अन् चलन पावत्या; ६० ते ७० प्रकरणे आली उघडकीस

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात काही खाजगी अभियंत्यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या आणि चलन पावत्या फोटोशॉपमध्ये एडिट करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून नगरपरिषदेसह नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून, आतापर्यंत ६० ते ७० प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरपरिषद संबंधित खाजगी अभियंते व दलालांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात नव्याने अभियंता म्हणून व्यवसाय सुरू केलेल्या काही तरुणांनी बांधकाम परवानगी मिळवून देण्याची कामे घेत नागरिकांना नगरपरिषदेत येण्याची गरज नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांचे अर्ज नगरपरिषदेत सादर न करता उपलब्ध परवानगी व चलन पावत्यांचे फोटोशॉपच्या माध्यमातून संपादन करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. ही कागदपत्रे अधिकृत असल्याचे भासवून नागरिकांना देण्यात आली. काही नागरिक बांधकाम परवानगीसंदर्भात नगरपरिषदेत आले असता त्यांच्या परवानग्या ऑनलाइन पोर्टलवर दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एका खाजगी अभियंत्याचे नाव समोर आल्याने पालिका अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात मूळ परवानगी व पावती फोटोशॉपमध्ये एडिट करून नागरिकांना दिल्याचा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, या बनावट बांधकाम परवानग्या व पावत्यांच्या आधारे काही नागरिकांना बँकांकडून कर्जदेखील मंजूर झाले आहे. आतापर्यंत ६० ते ७० प्रकरणे उघडकीस आली असून, यापेक्षा अधिक प्रकरणे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाले असून, नागरिकांकडून परवानगीच्या नावाखाली घेतलेले पैसे संबंधितांनी स्वतःच्या खिशात घातल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. यापुढे क्यूआर कोडच्या माध्यमातून बांधकाम परवानग्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणाची माहिती देण्यासाठी बँकांनाही पत्र दिले जाणार आहे. नागरिकांनी आपली बांधकाम परवानगी अधिकृत बीपीएमएस प्रणालीवर नोंदवली आहे किंवा नाही, याची खात्री करावी. अनधिकृत परवानगी ग्राह्य धरली जाणार नसल्याने नागरिकांनी आपल्या परवानग्या अधिकृत करून घ्याव्यात, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात येणार आहे.

 

फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

 

“नगरपरिषद आणि नागरिकांना लुटणाऱ्या सर्व अभियंते व दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंदर्भात मुख्याधिकारी व बांधकाम अभियंते याना आदेश देऊन उचित कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

 डॉ.परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *