अमळनेर तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना; देवगाव देवळीत आरोपीला अटक, वावडे प्रकरणात चौघांवर गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव देवळी येथे घरात घुसून २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगाव देवळी येथील २७ वर्षीय महिला घरात एकटी असताना गावातील श्याम धर्मा महाजन (वय ३०) हा घरात घुसला. त्याने महिलेशी अंगलट करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रतिकार केला असता तिचे ब्लाउज फाटले. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील एक महिला धावत घरात आली, तेव्हा श्याम महाजन तेथून पळून गेला. त्यानंतर महिलेची सासूही तेथे आली. सायंकाळी पती व सासरे शेतातून घरी आल्यानंतर महिलेने घडलेली हकीगत त्यांना सांगितली. त्यानंतर पती व सासरे श्याम महाजन याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने महिलेला लाकडी दांडक्याने पायावर व पाठिवर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महिलेच्या सासऱ्याने त्याला ‘इज्जत विकू नको’ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने उर्मट भाषा वापरून दादागिरी केल्याने अपमानित झाल्याच्या भावनेतून महिलेच्या सासऱ्याने विष प्राशन केले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७६, ३३३, ११८(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी श्याम धर्मा महाजन याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत. दरम्यान, तालुक्यातील वावडे येथेही चौघांनी घरात घुसून महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. वावडे येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सुधाकर सुभाष पाटील (ठाकरे), प्रभाकर सुभाष पाटील, सुभाष केशव पाटील व उषाबाई सुभाष पाटील हे घरात घुसले. कोणतेही कारण नसताना त्यांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने पाठीवर मारहाण केली. सुधाकर सुभाष पाटील याने महिलेचा ब्लाउज फाडल्याचा, तर प्रभाकर सुभाष पाटील याने विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७६, ७९, ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *