
अमळनेरमध्ये ३० नोव्हेंबरपासून ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन व्याख्यानमाला’; तीन दिवस विचारवंतांची मांदियाळी!
अमळनेर (प्रतिनिधी )युवक कल्याण प्रतिष्ठान व पुरोगामी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दररोज सायंकाळी ६.३० वाजता ही व्याख्यानमाला पार पडणार आहे. या व्याख्यानमालेत विविध सामाजिक, राजकीय आणि वैचारिक विषयांवर नामवंत विचारवंत आपले विचार मांडणार आहेत.

व्याख्यानमालेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
३० नोव्हेंबर : सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांचे ‘संविधान, लोकशाही आणि जनतेचा आवाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
१ डिसेंबर : मुंबई विद्यापीठाचे विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार हे ‘समकालीन महाराष्ट्रातील विद्रोह’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
२ डिसेंबर : प्रा. प्रतिमा परदेशी यांचे ‘सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाला अर्बनचे रणजित शिंदे, किरण माळी, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, निवेदिता कापडणे तसेच नगरसेविका योगिता कापडणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समाजातील संविधानिक मूल्ये, लोकशाही, सामाजिक समता, परिवर्तनवादी विचार आणि सामाजिक न्याय यांवर वैचारिक मंथन घडवून आणणारी ही व्याख्यानमाला अमळनेरकरांसाठी महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे. या प्रबोधनपर व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांच्या या वैचारिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवक कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply