नगावच्या डंपर हत्याकांडातील तीन फरार आरोपी साताऱ्यातून जेरबंद

अमळनेर (प्रतिनिधी) नगाव बुद्रुक येथील शरद रतन पाटील यांना डंपरखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी फरार असलेल्या तिघा आरोपींना अमळनेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरातून अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ ऑक्टोबर रोजी नगाव बुद्रुक येथील शरद रतन पाटील हे आपल्या मित्रांसोबत नांद्री बसस्थानकाजवळ उभे होते. त्यावेळी विपुल किरण गोसावी, मयुर अनिल बोरसे आणि सागर संजय गोसावी हे चारचाकी वाहनाने वेगाने आले. त्यांनी कट मारल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्याचवेळी पातोंडाकडून येणाऱ्या एचआर ३७ डी ८९५७ क्रमांकाच्या डंपरचा चालक भरत सुभाष पाटील हा देखील खाली उतरून शिवीगाळ करू लागला. वाद वाढल्यानंतर तिघांनी भरत पाटील याला चिथावणी देत, शरद पाटील हे आपल्याविरुद्ध साक्ष देत असल्याने त्यांच्या अंगावर डंपर चालविण्यास सांगितले. त्यानुसार भरत पाटील याने डंपर त्यांच्या अंगावर घातल्याने शरद पाटील यांचे पाय चिरडले गेले. उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डंपरचालक भरत सुभाष पाटील याला घटनास्थळीच अटक करण्यात आली होती, तर विपुल किरण गोसावी, मयुर अनिल बोरसे आणि सागर संजय गोसावी हे तिघे फरार झाले होते. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नगाव ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले होते. या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता तिन्ही फरार आरोपी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचणी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल उज्वल पाटील यांनी चिंचणी गावात जाऊन आरोपींना पकडले. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, सिद्धांत शिसोदे आणि योगेश बागुल यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वाजे यांनी त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *