तहसीलदारांच्या नावाने ५० हजारांची लाच मागणी; एसीबीचा सापळा, दोन जेरबंद

अमळनेर (प्रतिनिधी) खनिज वाहतूक व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराकडून तहसीलदारांच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या दोन खाजगी इसमांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीस २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील आरोपी रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम, ता. अमळनेर) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी, पो. शिरसाळे, ता. अमळनेर) अशी आहेत. तक्रारदाराचा खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून, मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळू वाहतुकीस परवानगी मिळवून देण्यासाठी आरोपींनी तहसीलदारांच्या नावाने प्रति ट्रॅक्टर २५ हजार रुपये, अशा दोन ट्रॅक्टरसाठी एकूण ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने धुळे येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर २८ एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांच्या मागणीवर ठाम राहिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबी पथकाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान जितेंद्र पाटील याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताच पंचांसमक्ष त्याला रंगेहात जेरबंद करण्यात आले. या घटनेनंतर दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७-अ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजता अमळनेर तहसील कार्यालयातही एसीबी पथकाने तपास केला. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या दालनाची पाहणी करण्यात आली; मात्र प्रत्यक्ष लाच व्यवहार झाल्याचे स्पष्ट न झाल्याने पुढील तपासासाठी कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. तहसीलदार सुराणा यांना चौकशीसाठी धुळे येथे बोलावण्यात आले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी सापळा अधिकारी म्हणून पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करीत असून एसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *