
महाराणा प्रताप चौकात भटक्या जनावरांचा विळखा; वाहतुकीसह सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात भटक्या जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यात जनावरे बसत असल्याने वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत असून वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी या परिसरात अपघाताचा धोकाही वाढला आहे.
महाराणा प्रताप चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि नेहमीच वर्दळीचा चौक असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी भटक्या जनावरांचा ठिय्या असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply