आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये ‘जलक्रांती’; भूजल पातळी वाढली अन् टँकरमुक्तीकडे वाटचाल

आमदार अनिल दादा पाटील यांच्या पुढाकारातून सुमारे १०२ कोटी ६९ लाख ६५ हजार रुपयांची कामे

 

अमळनेर (प्रतिनिधी) पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त आणि दुष्काळप्रवण अशी ओळख असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात जलसंधारणाच्या माध्यमातून मोठा बदल घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. अनियमित पर्जन्यमान, सातत्याने खालावत जाणारी भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे शेतकरी व ग्रामीण नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पुढाकारातून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजनेंतर्गत सुमारे १०२ कोटी ६९ लाख ६५ हजार रुपये निधीतून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

राज्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव प्रायोगिक प्रकल्पामुळे अमळनेर मतदारसंघातील विविध गावांमध्ये जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली असून भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, मृदसंवर्धन, पूरनियंत्रण आणि ग्रामीण पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळाला आहे. लोकप्रतिनिधी झाल्यापासूनच आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांनी अमळनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून जलसंधारणावर आधारित विकासाचा आराखडा तयार केला. निम्न तापी पाडळसरे धरणासह नदी-नाल्यांवर लघु व मध्यम जलसाठे निर्माण करून पावसाचे पाणी गावातच अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीसाठी वर्षभर स्थिर पाणीस्रोत उपलब्ध करून देणे, हे या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री असताना अनिल भाईदास पाटील यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दुष्काळ शमन, मृदसंवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन यांचा समन्वय साधत आर्च बंधाऱ्यांची अभिनव प्रायोगिक योजना मंजूर करून घेतली. त्यातून मतदारसंघातील विविध नदी-नाल्यांवर आर्च बंधारे, संरक्षण भिंती आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याची कामे सुरू झाली.

 

आर्च बंधारा – आधुनिक जलसंधारणाची प्रभावी संकल्पना

 

आर्च बंधारा हा जलसंधारण क्षेत्रातील आधुनिक आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने प्रभावी प्रकार मानला जातो. कमानीच्या आकारात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यामुळे पाण्याचा दाब संरचनेवर थेट न येता दोन्ही बाजूंच्या खडकाळ काठांवर वितरित होतो. त्यामुळे तुलनेने कमी काँक्रीटमध्ये मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी संरचना उभारणे शक्य होते. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले जाते, भूजल पुनर्भरणास चालना मिळते, विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. नदीकाठच्या शेतीला ओलावा मिळतो, सिंचनाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होते, मृदा धूप कमी होते आणि पूरस्थितीत पाण्याचा वेग नियंत्रित करण्यासही मदत मिळते. भूजल पुनर्भरणामुळे टँकरमुक्तीकडे अमळनेरची वाटचाल या प्रकल्पाचा परिणाम भूजल पातळीतील वाढीच्या स्वरूपात दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्च बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून जमिनीत मुरत असल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर स्रोत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. या व्यवस्थेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होत होता. मात्र भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे यंदा अनेक गावांमध्ये टँकरची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी झाली असून काही गावे टँकरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगण्यात आले. शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ आर्च बंधाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा थेट लाभ शेतीला होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढण्यास मदत होत असून दुबार आणि तिबार पीकपद्धतीला चालना मिळत आहे.

फळबाग विकास, पशुपालन आणि इतर पूरक व्यवसायांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारत आहे. भूजल पुनर्भरणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली असून नागरिकांना अधिक स्थिर पाणीस्रोत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

 

पूरनियंत्रणासाठी संरक्षण भिंतींचेही महत्त्वपूर्ण योगदान

 

या योजनेत केवळ आर्च बंधाऱ्यांचा समावेश नसून नदीकाठ संवर्धन, संरक्षण भिंती, तटबंदी आणि पूरप्रतिबंधक संरचनांची कामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीकाठची धूप कमी होण्यास, गावांचे संरक्षण करण्यास तसेच सार्वजनिक आणि कृषी मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत होत आहे.

 

अनेक कामे पूर्ण; उर्वरित अंतिम टप्प्यात

 

मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक आर्च बंधारे पूर्णत्वास आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकून राहण्यास मदत होत आहे. भविष्यात या प्रकल्पांचा जलसुरक्षा, कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

मंजूर करण्यात आलेली प्रमुख कामे

 

आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजनेत पुढील कामांचा समावेश आहे – मुडी संरक्षण भिंत (२५० लाख रुपये), अमळगाव–चिखली नदीवरील आर्च बंधारा (२९५.३२ लाख रुपये), चोपडाई–लोकल नाल्यावर आर्च बंधारा (२०६.९२ लाख रुपये), दहिवद आर्च बंधारा (१७७.१५ लाख रुपये), ढेकू खुर्द आर्च बंधारा (१७६.२० लाख रुपये), जानवे आर्च बंधारा (१६०.७४ लाख रुपये), डांगरी–माळण नदीवरील आर्च बंधारा (२३९.७५ लाख रुपये), लोणे–भोणे फाटा–खैनी नदीवरील आर्च बंधारा (२३६.७२ लाख रुपये), मारवड–माळण नदीवरील आर्च बंधारा (२३४.६५ लाख रुपये), सडावण आर्च बंधारा (२३७.७५ लाख रुपये), सारबेटे आर्च बंधारा (२३७.७५ लाख रुपये), अमळनेर आर्च बंधारा (२१५.२४ लाख रुपये), नंदगाव आर्च बंधारा (२१६.०४ लाख रुपये), वावडे आर्च बंधारा (१९८.७३ लाख रुपये), मांडळ आर्च बंधारा (१९८.७३ लाख रुपये), पातोंडा आर्च बंधारा (२२१.९२ लाख रुपये), गडखांब आर्च बंधारा (१७५.२९ लाख रुपये), देवळी आर्च बंधारा (१९५.९७ लाख रुपये), नांद्री आर्च बंधारा (१८६ लाख रुपये), कन्हेरे–बोरी नदीवरील आर्च बंधारा (८०७ लाख रुपये), मुंगसे–तापी नदीलगत संरक्षण भिंत (१०० लाख रुपये), तांबापुरा, अमळनेर–महादेव मंदिराजवळ संरक्षण भिंत (१०० लाख रुपये), पिंपळे खुर्द संरक्षण भिंत (७० लाख रुपये), माळण नदीवरील अतिरिक्त आर्च बंधारा (२३७.५९ लाख रुपये), निमझरी आर्च बंधारा (२०५.४९ लाख रुपये), सावखेडा–मुंगसे दरम्यान तापी नदीलगत संरक्षण भिंत (१०० लाख रुपये), अमळनेर–बोरी नदीवरील आर्च बंधारा (८११.६६ लाख रुपये), मुडी–बोरी नदीवरील आर्च बंधारा (१००१.२३ लाख रुपये), भिलाली आर्च बंधारा (२३७.६० लाख रुपये) आणि अमळनेर–बोरी नदीवरील आर्च बंधारा व पुलाचे काम (२५३८.२१ लाख रुपये). या सर्व कामांसाठी एकूण १०२ कोटी ६९ लाख ६५ हजार रुपये (अंदाजित) निधी मंजूर करण्यात आला असून, जलसंधारण, भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, पूरनियंत्रण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अमळनेर मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

जलसुरक्षित, सिंचनसमृद्ध आणि टँकरमुक्त अमळनेरकडे वाटचाल

 

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे, भूजल पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि टँकरमुक्त गावांची निर्मिती करणे ही या प्रकल्पामागील व्यापक संकल्पना आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा अभिनव प्रायोगिक प्रकल्प अमळनेर मतदारसंघाला जलसुरक्षित, कृषीसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, भविष्यात राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांसाठीही हा उपक्रम आदर्श ठरू शकतो.

 

– अनिलदादा भाईदास पाटील, माजी मंत्री तथा आमदार, अमळनेर विधानसभा मतदारसंघ 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *