
“जेष्ठ पत्रकार पंडित नाना चौधरींचा दाखला देत सवाल; राजकारणावर कुणाची मक्तेदारी?”
राजकारण कुणाच्या घराण्याची जहागीर नाही; लोकशाही कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही!
पत्रकार जितेंद्र ठाकूर यांचा नगरसेवक पंकज चौधरी यांच्यावर टीकेची झोड उठवत उपस्थित केला थेट तिखट सवाल
पत्रकारांनी राजकारणात येऊ नये’ या भूमिकेवरून केला जोरदार प्रतिवाद
अमळनेर (प्रतिनिधी) राजकारण म्हणजे समाजकारणाचा एक भाग, तर पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा. वर्षानुवर्षे समाजाचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडणाऱ्या पत्रकारांनी राजकारणात येऊ नये, अशी भूमिका काहींना का घ्यावी लागते? पत्रकार राजकारणात आले तर नेमकी अडचण कोणाची होते? आणि जर पत्रकारांच्या राजकीय प्रवेशाचीच भीती वाटत असेल, तर त्यामागचे कारण काय? असे थेट सवाल पत्रकार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांनी नगरसेवक पंकज चौधरी यांना केले आहेत. ‘राजकारणात रिकामटेकड्यांची मक्तेदारी वाढल्याने पत्रकारांनी राजकारणात येण्याची गरज निर्माण झाली आहे’, अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच ‘आपले पितळ उघडे पडण्याची भीती असल्यानेच काहींना पत्रकारांचा धाक’ असल्याने त्यांना पोटशुळ उठल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांनी राजकारणात येऊ नये, असे म्हणणाऱ्या पंकज चौधरींनी आधी स्वतःच्या घरातील इतिहास तपासावा, असे सांगत जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे की, “आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार आदरणीय पंडित नाना चौधरी यांनी पत्रकारिता केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी निवडणुका लढवल्या आणि आजही सहकार क्षेत्रात बँक संचालक म्हणून कार्यरत आहेत.” अशी आठवण करून देत थेट त्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. यावरून त्यांनी थेट सवाल उपस्थित केला की, पत्रकारांनी राजकारणात येऊ नये, असा नियम नेमका कुणी आणि कुठे केला आहे? “आपल्या बापाची मक्तेदारी आहे का राजकारणावर?” असा स्पष्ट आणि थेट तिखट सवाल त्यांनी केला. ज्यांच्या घरातील ज्येष्ठांनी पत्रकारिता आणि राजकारणाचा संगम अनुभवला, त्यांच्याच पुढच्या पिढीने पत्रकारांच्या राजकीय प्रवेशावर आक्षेप घेणे हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “पंडित नानांनी आम्हाला पत्रकारितेची शिकवण दिली; तीच शिकवण आपल्या मुलाला का मिळाली नाही, याचेच आम्हाला आश्चर्य नाहीतर खंतही वाटते!” असे जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
पत्रकार समाजाचा आरसा; चेहरा सुधारण्याची गरज
“पत्रकार समाजाचा आरसा आहे. आरशात चेहरा दिसला म्हणून आरशावर राग काढण्यापेक्षा चेहरा सुधारण्याची गरज असते,” असे सांगत जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी आपली पत्रकारितेची भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांनी वर्षानुवर्षे जनतेचे प्रश्न मांडले, अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि प्रशासनाला जाब विचारला. मग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच पत्रकाराने राजकारणात प्रवेश केला तर त्यात गैर काय, इतरांना पोटशुळ उठण्याचे कारण काय, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पत्रकार राजकारणात का यावा?
पत्रकार एसी कार्यालयात बसून समाजाचे प्रश्न समजून घेत नाही. तो शेताच्या बांधावर जातो, कामगारांच्या वस्तीत जातो, व्यापाऱ्यांच्या अडचणी ऐकतो, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतो आणि सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्याला प्रश्न कागदावरचे नसतात; ते प्रत्यक्ष अनुभवलेले असतात. प्रश्नांची खरी जाण असलेला नेता म्हणून पत्रकाराचा अनुभव उपयोगी ठरू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
भ्रष्टाचाराविरोधात केवळ बातमी नाही, तर व्यवस्था बदलण्याची भूमिका…
पत्रकाराने वर्षानुवर्षे प्रशासनातील त्रुटी, गैरव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी जनतेसमोर आणलेल्या असतात. त्यामुळे व्यवस्थेतील अडथळे कुठे निर्माण होतात, हे त्याला माहीत असते. सत्तेत गेल्यावर त्याच अनुभवाचा उपयोग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत जाणणारा..
ज्याने स्वतः लेखणीच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत, त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार किती महत्त्वाचा आहे हे माहीत असते. त्यामुळे लोकशाहीत संवाद आणि विरोधकांचे मत ऐकण्याची संस्कृती अधिक बळकट करण्याची संधी असते, असे जितेंद्र ठाकूर यांनी नमूद केले.
जनतेशी थेट नाते…
पत्रकाराची खरी ताकद ही त्याच्या लेखणीत आणि जनतेशी असलेल्या नात्यात असते. सामान्य कुटुंबातून आलेल्या पत्रकाराला समाजाने साथ दिली, तर ते त्या समाजाच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पत्रकारितेतून राजकारणात आलेल्यांची परंपरा…
महाराष्ट्रात पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन यांचा संबंध जुना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभाव निर्माण केला. त्यामुळे पत्रकारितेचा अनुभव घेऊन सार्वजनिक जीवनात येणे ही काही नवीन बाब नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
‘मी स्वतः सामान्य कुटुंबातील पत्रकार; जनतेच्या आशीर्वादावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलो’
“मी स्वतः सामान्य कुटुंबातील पत्रकार असूनही जनतेच्या आशीर्वादावर लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो. निवडणुकीत विजय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे; मात्र सामान्य पत्रकाराला समाजाने दिलेले प्रेम आणि मतदान हा पत्रकारितेवरील जनतेच्या विश्वासाचा विषय आहे,” असे जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांनी सांगितले.
‘नगरसेवक पंकज चौधरी यांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारावा’
पत्रकारांच्या राजकीय प्रवेशाला विरोध करण्याऐवजी पंकज चौधरी यांनी एक साधा प्रश्न स्वतःला विचारावा, असे म्हणत जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांनी थेट सवाल केला, “जर पत्रकार राजकारणात येत असतील, तर तुम्हाला त्याची भीती का वाटते?” यासोबतच त्यांनी ठाम शब्दांत म्हटले आहे, “राजकारण कुणाच्या घराण्याची जहागीर नाही, लोकशाही कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही!” जनतेला योग्य वाटेल त्याला मत देण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पत्रकार असो, शेतकरी असो, व्यापारी असो किंवा सामान्य नागरिक—राजकारणात येण्याचा अधिकार सर्वांना समान आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेवटी लेखणीच्या ताकदीचा उल्लेख करत जितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “लेखणीला घाबरणाऱ्यांनी लेखणी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; कारण लेखणी थांबली तरी प्रश्न थांबत नाहीत!”

Leave a Reply