आर.के. नगरातून मध्यरात्री इको गाडी चोरीला; घरफोड्यांच्या घटनांशीही संबंध असल्याचा संशय

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आर.के. नगर परिसरातून सिल्वर रंगाची मारुती सुझुकी इको गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याच रात्री शहरातील बोरसे गल्ली तसेच तालुक्यातील जानवे येथे घरफोडीच्या घटना घडल्याने या सर्व घटनांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आर.के. नगर परिसरात रात्रीच्या सुमारास सिल्वर रंगाची मारुती सुझुकी इको गाडी (एमएच १९,डीव्ही ८४२९  ) पार्क करण्यात आली होती. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे स्कोडा कंपनीच्या गाडीतून परिसरात आले. स्कोडा गाडीमधून काही जण खाली उतरले आणि त्यांनी इको गाडीच्या दिशेने जात ती चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

गाडी चोरी केल्यानंतर चोरटे धुळे रस्त्याच्या दिशेने गेल्याचे समोर आले आहे. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंप तसेच एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्कोडा आणि इको या दोन्ही गाड्या धुळ्याकडे जाताना दिसून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, याच रात्री अमळनेर शहरातील बोरसे गल्ली परिसरात दोन घरे फोडण्यात आली. या घरफोडीच्या घटनांदरम्यानही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित स्कोडा गाडी दिसून आली आहे. तसेच तालुक्यातील जानवे येथेही याच रात्री दोन घरफोडीच्या घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे आर.के. नगरातून इको गाडी चोरी करणाऱ्या चोरट्यांनीच या घरफोड्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. एकाच रात्री वाहन चोरीसह शहर व तालुक्यात घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित वाहन स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्याच्या आधारे पोलिस तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, इको गाडीचे मालक सुनील शर्मा, रा. आर.के. नगर, अमळनेर यांनी याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. मात्र, तक्रार देण्यात आली असली तरी बातमी लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, चोरीला गेलेली गाडी आणि संशयित चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *