नांद्री विकास मंचाची प्रेरणादायी वाटचाल; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्री येथील जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या तरुण सुपुत्रांनी एकत्र येत ‘नांद्री विकास मंच’ची स्थापना केली असून, गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक व ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच संकल्पाचा भाग म्हणून देशात सुरू असलेल्या ‘सेवा सप्ताहा’चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळा, नांद्री येथील सुमारे ४० गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय उपयुक्त साहित्य व खाऊचे वाटप केले. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “आम्ही याच शाळेत घडलो आणि आज बाहेरच्या जगात उभे आहोत. लहानपणी शिक्षकांनी दिलेली शिकवण होती की, ‘आपण किती शिकलो यापेक्षा आपल्या शिक्षणाचा समाजाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचे आहे.’ त्याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही गावातील शेती, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम करणार आहोत.” गावात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाच्या दिशेनेही मंचाने ठोस पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. येत्या काळात सीएसआर निधी, लोकवर्गणी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण व पाणलोट बंधारे बांधण्याचे उपक्रम राबविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. धावपळीच्या आणि स्वार्थी युगात आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांचा हा उपक्रम इतर गावांतील तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *