अमळनेर शहर व तालुक्यात आगीचे तांडव सुरूच; ढेकू तांड्यावर २२ बिघे पिके जळून झाली खाक

अमळनेर (प्रतिनिधी)  वाढत्या तापमानामुळे अमळनेर शहर व तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आगीचे तांडव सुरूच आहे. काल दुपारी ढेकू तांडा येथे लागलेल्या भीषण आगीत सुमारे २२ बिघे क्षेत्रातील मका, बाजरी, गहू आणि हरभरा ही पिके जळून खाक झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ढेकू तांडा येथील शेतात अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करत २२ बिघे क्षेत्र व्यापले. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आगीचे लोण जवळील तांड्यापर्यंत पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, अमळनेर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. या कार्यात अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, जफर पठाण आणि आकाश संदानशिव यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. सतत वाढणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

अग्निशमन दिनीही दोन ठिकाणी आग

१४ एप्रिल रोजी अग्निशमन दिनाच्या दिवशीही आगीच्या दोन घटना घडल्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास वर्णेश्वर मंदिराजवळ शॉर्टसर्किटमुळे झाडांना आग लागली. तसेच ग्रामीण भागातील आर्डी येथे राहुल पाटील यांच्या शेतातील चाऱ्यास आग लागली. या दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य अनर्थ टाळला.

या कारवाईत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, आनंदा झिम्बल, आकाश संदानशिव, लखन कंखरे आणि वसीम पठाण यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *