
मांडळ ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांची नाराजी; चौकशीची करण्याची केली मागणी
माहिती न देणे, अरेरावीची भाषा व नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीतील कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून ग्रामसेवकांकडून नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकासकामांची माहिती लपविणे, अरेरावीची भाषा वापरणे तसेच गरीब नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे तालुका उपाध्यक्ष वासुदेव भालेराव पवार (वासू मामा) यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक प्रांजल वाघ यांच्यावर नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देणे, अरेरावीची भाषा वापरणे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर विकासकामांची माहिती न देण्याचे आरोप करण्यात आले आहेत.
विशेषतः मांडळ गावातील अंडरग्राऊंड गटारीच्या कामाबाबत नागरिकांनी वारंवार विचारणा करूनही संबंधित योजना, मंजुरी, अंदाजपत्रक आणि खर्चाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावातील गरीब नागरिकांना घरपट्टी, नळपट्टी आदी बाबींमध्ये त्रास दिला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांचा अपमान होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी न झाल्यास ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसेवकांविरोधात आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे तालुका उपाध्यक्ष वासुदेव भालेराव पवार (वासू मामा) यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले आहे.

Leave a Reply