
निर्भय साळुंखेला जेईई मेनमध्ये ९९.८ पर्सेंटाइल; आयआयटी दिल्लीत प्रवेश, सीईटीमध्येही ९९.९ पर्सेंटाइलची चमक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी निर्भय संदीपकुमार साळुंखे याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत जेईई मेन परीक्षेत ९९.८ पर्सेंटाइल मिळविले आहेत. विशेष म्हणजे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत त्याने संपूर्ण भारतात दोन हजारावा क्रमांक मिळविला असून, देशातील प्रतिष्ठित आयआयटी दिल्लीमध्ये त्याला नुकताच प्रवेश मिळाला आहे.
यावरच न थांबता निर्भयने नुकत्याच झालेल्या सीईटी परीक्षेतही ९९.९ पर्सेंटाइल मिळवत आणखी एक यशस्वी झेप घेतली आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे अमळनेर तालुक्यासह मारवड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
निर्भय हा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या लेखिका मोनाली साळुंखे यांचा मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल नाशिक आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य उमेश काटे, डॉ. जी. व्ही. देसले तसेच मारवड विकास मंचाचे देवेंद्र साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply