अमळनेर नगरपरिषदेत ‘१० मिनिटांची सभा’; विरोधकांचा संताप, “लोकशाहीची गळचेपी” केल्याचा आरोप

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रारींचा भडिमार झाल्यानंतर अमळनेर नगरपरिषदेत २० एप्रिल रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत कोणतीही सविस्तर चर्चा न करता आटोपण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. हा प्रकार “पूर्वनियोजित खेळ असून लोकशाहीची थेट गळचेपी” असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

याबाबत नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेच्या अजेंड्यावर शहराच्या विकासाशी संबंधित तब्बल २७ महत्त्वाचे विषय समाविष्ट होते. मात्र बैठक सुरू होताच कोणतीही चर्चा न करता ती घाईघाईने संपवण्यात आली. विशेष म्हणजे शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना एकही मुद्दा मांडण्याची संधी न देता थेट सभा संपल्याची घोषणा करण्यात आली. तसेच सर्व विषय सत्ताधाऱ्यांच्या “बहुमताने” मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर विरोधी गटाने “ही प्रक्रिया आधीच ठरवलेली होती का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. “जनतेचे प्रश्न दाबण्यासाठीच सभा १० मिनिटांत गुंडाळण्यात आली. नगरसेवकांना बोलू दिले नाही, म्हणजे लोकशाहीला कुलूप लावले,” अशा तीव्र प्रतिक्रिया अनेक नगरसेवकांनी व्यक्त केल्या. या घडामोडींमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक नगरसेवकांनी हा प्रकार “लोकशाहीचा उघड अपमान” असल्याचे सांगत प्रशासनावर जोरदार टीका केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकारामागील जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहर विकास आघाडीचे व अपक्ष नगरसेवक राजू फाफोरेकर, भरतकुमार ललवाणी, देवेंद्र कांबळे, सचिन पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, योगिता सयाजीराव कापडणे, अफसाना मुक्तार खाटीक, जुबेदाबी हाजी नसीर, कविता विजय राजपूत, शोभाबाई गढरे, नंदाताई नरेंद्र संदानशिव, विजय कहारु पाटील आदींनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *