रामेश्वर खुर्द मुख्य रस्त्याची दुरवस्था; अपघातांची मालिका, नागरिकांचा संताप

अमळनेर (प्रतिनिधी ) रामेश्वर खुर्द  गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रोज हजारो वाहनांची ये-जा या मार्गावरून होत असतानाही दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत. काहीजण जखमीही झाले असून भविष्यात गंभीर जीवितहानी होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षच होत आहे. “रोज हजारो वाहनं या रस्त्यावरून जातात, अपघात घडत आहेत; तरीही प्रशासन कोणतीही दखल घेत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

रामेश्वर खुर्द ग्रामस्थ मंडळाने अमळनेर येथील सर्व पत्रकारांना या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून प्रशासन जागे होऊन नागरिकांना न्याय मिळेल.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *