अमळनेरचे स्वर आफ्रिकेत गुंजले; स्वामी तोलानी व हरी तोलानी यांचे आंतरराष्ट्रीय सादरीकरण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सुप्रसिद्ध गायक रॉकस्टार स्वामी तोलानी आणि गायक हरी तोलानी यांची टीम सध्या आफ्रिकेतील सिएरा लिओन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमासाठी पोहोचली असून तेथे त्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आफ्रिकेत सोमवार, दि. १६ मार्च ते मंगळवार, दि. २४ मार्च दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान अमळनेरचे स्वर आफ्रिकेतील रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात २१ वर्षीय गायक रॉकस्टार स्वामी तोलानी आणि गायक हरी तोलानी यांच्याकडून चित्रपट गीतांची रात्र, भजन संध्या, माता की चौकी तसेच चेट्रीचंद्र सिंधी महोत्सवाचे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात त्यांना नितीन गुरव आणि जयेश संदानशिव हे कलाकारही साथ देत आहेत. त्यांच्या सादरीकरणामुळे आफ्रिकेतील रसिकांमध्ये भारतीय संगीताची रंगत अनुभवायला मिळत आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी अमळनेरमधील कलाकारांची निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यासह अमळनेर शहर आणि खान्देश परिसरातून त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वीही स्वामी तोलानी आणि हरी तोलानी यांनी परदेशात विविध संगीत कार्यक्रम सादर केले आहेत.

रॉकस्टार स्वामी तोलानी व हरी तोलानी हे अमळनेर येथील मधु हार्डवेअरचे संचालक जितेंद्र तोलानी यांचे पुतणे व बंधू असून त्यांच्या या यशाबद्दल शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *