
दिल्लीत राष्ट्रीय ड्रोन परिषदेत अमळनेरच्या राज शाह यांना मान
अमळनेर (प्रतिनिधी) भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या ड्रोन उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील ड्रोन परिषदेत अमळनेरचे राज शाह यांना प्रमुख वक्ते तसेच परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेत देशातील ड्रोन उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
कोहिरंट मार्केट इनसाइट्स आणि ड्रोन टेक एक्सलन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर भारतातील ड्रोन उद्योगाची सद्यस्थिती, भविष्यातील विस्तार आणि या क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधी यावर परिषदेत चर्चा होणार आहे.
ड्रोन उद्योगातील ‘व्हाइट स्पेसेस’वर मांडणार विचार
राज शाह हे कोहिरंट मार्केट इनसाइट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, परिषदेत ते ‘इंडिया ड्रोन इंडस्ट्री लँडस्केप’ या विषयावर मुख्य भाषण करणार आहेत. भारतातील ड्रोन उद्योगाची सद्यस्थिती, बाजारपेठेतील बदल, भविष्यातील वाढीच्या शक्यता, अद्याप विकसित न झालेल्या ‘व्हाइट स्पेसेस’ तसेच ड्रोन उद्योगाच्या संपूर्ण परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या मोठ्या व्यावसायिक संधी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
ड्रोनचा वापर सध्या संरक्षण क्षेत्राबरोबरच शेती, सर्वेक्षण, नकाशांकन, रसद व्यवस्था, पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि विविध औद्योगिक क्षेत्रांत वाढत आहे. त्यामुळे ड्रोन निर्मितीपासून सेवा, तंत्रज्ञान आणि संबंधित व्यवसायांपर्यंत संपूर्ण परिसंस्थेत निर्माण होणाऱ्या संधींचा आढावा राज शाह आपल्या भाषणातून मांडणार आहेत.
देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती
परिषदेच्या उद्घाटनासाठी ड्रोन टेक एक्सलन्स असोसिएशनचे अध्यक्ष हर्षा जोशी, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे मानवरहित प्रणाली विभागाचे प्रमुख स्वप्नील जालुंधवाला, निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक भीम शिवाणे, शस्त्र प्रणाली महासंचालक एअर मार्शल प्रेमकुमार कृष्णास्वामी तसेच ड्रोन टेक एक्सलन्स असोसिएशनचे मानद सचिव डॉ. प्रणय कुमार यांच्यासह ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
मिलिंद शाह व संध्या शाह यांचे चिरंजीव असलेले राज शाह यांना देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण ड्रोन परिषदेत प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेला सन्मान अमळनेरसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. राज शाह हे पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत अमळनेरच्या सुपुत्राला मिळालेल्या या संधीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेत राज शाह भारताच्या ड्रोन उद्योगाची दिशा आणि त्यातील नव्या संधींबाबत काय मांडणी करतात, याकडे ड्रोन उद्योगातील सहभागी तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply