निम्न तापी प्रकल्पावर १४६१ कोटींचा खर्च ; तीन वर्षांत टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य

उपसा सिंचन योजना ४२ टक्के मार्गी,कामाला समाधानकारक गती, आमदार अनिल पाटील यांनी केली पाहणी 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पावर आतापर्यंत १४६१.०१ कोटी रुपये खर्च झाले असून २४ प्रस्तंभांचे सुमारे ६० टक्के काम, तर उपसा सिंचन योजनेचे ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. धरणात सुमारे १८ मीटर पाणीसाठा राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाहणी दौऱ्यावेळी दिली.

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सकाळी ७.३० वाजता निम्न तापी प्रकल्प व उपसा सिंचन योजनांना भेट देऊन कार्यकारी अभियंता यशोदीप कडलग यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. डाव्या बाजूच्या माती धरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. उजव्या बाजूच्या माती धरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच प्रकल्पाचा सांडवा, विभाजक भिंत, मार्गदर्शक भिंत आदींची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे, संजय पुनाजी पाटील, एल. टी. पाटील, सुषमा देसले, रिता बाविस्कर, जितेंद्र ठाकूर, मुख्तार खाटीक, संभाजी पाटील, राजू फापोरेकर, दीपक बागुल, उपविभागीय अभियंता डी. सी. पाटील, हितेश भटूरकर, उपविभागीय अधिकारी वेणीमहादेव ठाकूर, जितेंद्र मोहोळ, मुख्याधिकारी गणेश शिंदे, प्रा. सुरेश पाटील, नगरसेवक देवेंद्र कांबळे, भरत ललवाणी, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भूषण भदाणे, रणजित पाटील, अनिल शिसोदे, सचिन पाटील, रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, विनोद कदम, संदीप जैन, नितीन निळे, उमेश वाल्हे, बाळू पाटील, गुणवन्त पाटील, वेद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रकल्पासाठी आणखी ३४२९ कोटींची गरज

 

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ३४२९.७६ कोटी रुपयांची आवश्यकता असून टप्पा क्रमांक १ साठी १६५०.२० कोटी रुपये लागणार आहेत. केंद्र शासनाकडून २७.२५ कोटी रुपये प्राप्त झाले असून राज्य शासनाने यावर्षी ५९.९९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

 

उपसा सिंचन योजनांना गती

 

भौगोलिक परिस्थितीमुळे कालव्याऐवजी उपसा सिंचन योजनांद्वारे पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवले जाणार आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. बोहरा येथील उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ च्या पंप हाऊसचे खोदकाम पूर्ण झाले आहे. तसेच कलाली येथील योजना क्रमांक ३ व ४ च्या पंप हाऊसचे खोदकामही पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत २५ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. ७४ किलोमीटर मुख्य पाईपलाईनपैकी ४६ किलोमीटर पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून वितरण प्रणालीसाठीच्या ४९१ किलोमीटरपैकी २०८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. खेडी बुद्रुक येथील उपसा सिंचन योजना क्रमांक १ च्या पंप हाऊससाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. सानेगुरुजी उपसा सिंचन योजना, बोहरा व कपिलेश्वर उपसा सिंचन योजनेतून ९,४९८ हेक्टर, योजना क्रमांक २ मधून ३,७६५ हेक्टर, कलाली योजना क्रमांक ३ मधून ३,९१२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजना क्रमांक ४ मधून अमळनेर, धरणगाव व पारोळा तालुक्यातील ५,९२१ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. तसेच चोपडा तालुक्यातील धुपे येथील पाचव्या योजनेतून २,५६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून पंपगृहासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे.

दरवर्षी ५०० कोटी निधी मिळाल्यास ३ वर्षांत काम पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्तंभ, वक्राकार द्वार व उपसा सिंचन योजनांचा टप्पा क्रमांक १ पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सरासरी ५०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास पुढील तीन वर्षांत काम पूर्ण होऊ शकते. टप्पा क्रमांक १ मध्ये एकूण ३२ हजार ३२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *