फलकबाजीला आवर घालण्यात पालिकेचे अपयश; महापुरुषांच्या फलकांचा अवमान, कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात वाढत्या अनधिकृत फलकबाजीमुळे महापुरुषांच्या फलकांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शहरात कोणतीही परवानगी न घेता ठिकठिकाणी फलक लावले जात असल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील ढेकू रोड परिसरात राजर्षी शाहू महाराज यांचा फलक गेल्या १५ वर्षांपासून लावण्यात आलेला आहे. मात्र रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार या व्यावसायिक कंपनीने त्या फलकावर स्वतःच्या जाहिरातीचे फलक लावून महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय शहरातील महाराणा प्रताप चौकातही फलकबाजीचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधीपासून लावलेल्या फलकांवर इतरांकडून नवीन फलक लावले जात असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अशा प्रकारांमुळे विविध समाजघटकांच्या भावना दुखावल्या जाऊन सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने रस्त्यावरून लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी फलकबाजीवर निर्बंध घातले आहेत. तसेच विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनधिकृत फलकांवर कारवाईची तरतूद आहे. मात्र शहरात शासकीय जागा, वीज खांब आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सर्रास फलक लावले जात असून संबंधित यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका केली जात आहे.

पालिकेची परवानगी घेऊन फलक लावल्यास शहरात शिस्त राहण्यास मदत होईल आणि पालिकेच्या महसुलातही वाढ होईल. मात्र नियमांचे पालन न झाल्याने अनधिकृत फलकांचा सुळसुळाट वाढत असून पालिकेच्या उत्पन्नालाही फटका बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

यापूर्वी मुंबईत अनधिकृत फलक कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अमळनेरमध्येही बेकायदेशीर फलकांमुळे वाद निर्माण होऊन संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

पालिकेला फलकांबाबत काळजी घेण्याचे पत्र

 

“प्राप्त तक्रारीनुसार भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पालिकेला फलकांबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे.”

– दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर

 

सर्व अनधिकृत डिजिटल फलक काढण्याचे  दिले आदेश

 

“सर्व अनधिकृत डिजिटल फलक काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही व्यवसायिकाने दुसऱ्याच्या फलकावर फलक लावू नये याबाबत सूचना देण्यात येतील.”

– गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *