
आषाढीवारी २०२६ साठी जळगाव जिल्ह्यात २.७२ कोटींचा निधी मंजूर
अमळनेरसह तीन पालख्यांतील वारकऱ्यांना शौचालय, स्नानगृह व पाणी सुविधा

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढीवारी २०२६ निमित्त जळगाव जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी आवश्यक तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रुपये २ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५ इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने दि. २३ जून २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, पालखी मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर फिरती शौचालये, स्नानगृहे तसेच टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या निधीचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले
श्री संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर पालखीसाठी : ₹२,०८,९३,०९५
श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अमळनेर पालखीसाठी : ₹२२,८१,४८५
श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव पालखीसाठी : ₹४१,०६,४९५
शासनाने मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच सुमारे ₹२७.२८ लाख निधी जिल्हा परिषद, जळगाव यांना वितरित केला आहे. उर्वरित निधी उपलब्ध तरतूद आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या मागण्या विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सदर निधी केवळ मंजूर कामांसाठीच वापरण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता, स्नान व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाचे वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
“वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाचा स्तुत्य निर्णय” – संत सखाराम महाराज संस्थान

या पार्श्वभूमीवर श्री संत सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज यांनी महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. वारकऱ्यांसाठी स्वच्छता, स्नान व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य असून, त्यामुळे हजारो भाविकांची वारी अधिक सुसह्य होणार आहे. शासनाने भविष्यातही वारकरी संप्रदायाच्या सोयीसाठी असेच सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply