कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत; विजेच्या खांबावर शॉक लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) भर पावसात नागरिकांच्या घरात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी कर्तव्य बजावत असताना महावितरणच्या वायरमनचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (२१ जुलै) सकाळी सुमारे १०.४५ वाजता भगवा चौक परिसरात घडली. या घटनेत शरद बन्सीगीर गोसावी (वय ३४, रा. डी. डी. नगर, अमळनेर) यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भगवा चौक परिसरात तुटलेली वीजवाहिनी दुरुस्त करण्यासाठी शरद बन्सीगीर गोसावी विजेच्या खांबावर चढले होते. संबंधित खांबावर दोन वितरण रोहित्रांचा वीजप्रवाह होता. त्यापैकी एका रोहित्राचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता; मात्र दुसऱ्या रोहित्रावरील वीजप्रवाह सुरूच असल्याने काम सुरू असताना त्यांच्या पायाला विजेचा शॉक लागला. शॉक लागल्यानंतर ते खांबाला चिकटले आणि त्यानंतर खाली कोसळले.

त्यांना तातडीने उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शरद गोसावी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून ठेवत निषेध व्यक्त केला. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली. घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर वातावरण शांत झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. डॉ. जयेश शिंदे यांनी शवविच्छेदन केले असून विजेचा शॉक लागल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भर पावसात जीवाची पर्वा न करता आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र दुरुस्त करून नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत करणारे शरद बन्सीगीर गोसावी हे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्याच कर्तव्याचे पालन करताना त्यांना प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती धरणगाव उपविभागीय कार्यालयाला देण्यात आल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी, भविष्य निर्वाह निधी, १० लाख रुपयांचा विमा, १५ लाख रुपयांचा कार्यालयीन विमा, उपदान निधी आदी लाभ तातडीने देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळेपर्यंत दरमहा ४ हजार रुपये आर्थिक आधार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तातडीची मदत म्हणून ८० हजार रुपये कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *