
दारूच्या नशेत रस्त्यावर झोपला अन् वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने मृत्यू ओढवला
अमळनेर (प्रतिनिधी) दारूच्या नशेत रस्त्यावर झोपून राहिलेल्या एका मजुराचा वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २३ जून रोजी सकाळी सुमारे आठ वाजता मुस्लिम कब्रस्तानाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रियाजोद्दीन शेख यांच्या विटाभट्टीवर लक्ष्मण (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) हा इसम गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीचे काम करत होता. त्याचे कोणतेही नातेवाईक अथवा कुटुंबीय परिसरात नसल्याने तो मुस्लिम कब्रस्तानासमोरील एका बंद बर्फ कारखान्यात वास्तव्यास होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते. सोमवारी सकाळी लक्ष्मण हा मुस्लिम कब्रस्तान रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी वाहनाच्या चाकांच्या खुणा आढळून आल्याने एखाद्या वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. मृताची संपूर्ण ओळख पटविण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply