अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमी निमित्त दि. २६ मार्च रोजी भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय व मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

या धार्मिक कार्यक्रमासाठी व्यावसायिक रणजीत पाटील व सरिता रणजीत पाटील हे प्रमुख यजमान होते. त्यांच्या हस्ते सपत्निक प्रधान संकल्प, गणपती पूजन व पुण्याहवाचन विधी पार पडले. त्यानंतर श्रीराम स्वरूप भगवान श्रीकृष्णांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. दुपारी बरोबर १२ वाजता मंगलध्वनी, घंटानाद व जयघोषाच्या वातावरणात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांच्या साक्षीने पाळणा सोहळा व पाळणागीत सादर करण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमासाठी जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, यतीन जोशी, मेहूल कुळकर्णी व वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले. दिवसभर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व भक्तांनी परिश्रम घेतले. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *