बळीराजाच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; सवाद्य मिरवणुकीनंतर स्मारकावर बळीपूजन व अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) बलिप्रतिपदेनिमित्त अमळनेर शहरात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची पारंपरिक पद्धतीने सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीची सांगता बळीराजा स्मारकावर झाली. यावेळी आजी-माजी आमदारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विधिवत बळीपूजन करून महात्मा बळीराजांना अभिवादन केले. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीची सुरुवात पटवारी कॉलनी येथून झाली. मांडळ येथील ज्येष्ठ शेतकरी पंढरीनाथ पाटील आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर निकम यांच्या हस्ते बैलगाडी व नांगरपूजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक श्याम पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी सभापती डॉ. दिपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कैलास पाटील, अरुण देशमुख, अशोक बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजांची महती सांगितली, तर अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. शेतकरी गीतांच्या गजरात आणि बँडच्या तालावर निघालेली मिरवणूक मराठा कॉलनी, शिरूड नाका, स्वामी समर्थ मंदिर, विजय मारुती, धुळे रोडमार्गे महाराणा प्रताप चौकातून फुलांनी सजविण्यात आलेल्या महात्मा बळीराजा स्मारकावर पोहोचली. मिरवणुकीतील सजविलेल्या वाहनावर महात्मा बळीराजा यांची भव्य प्रतिमा विराजमान होती. तसेच भव्य नांगरासोबत बाल शिवराय आणि राजमाता जिजाऊ उभे असलेली बैलगाडी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी प्रतिमेचे दर्शन घेत पुष्पवृष्टी केली.

मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांनी स्मारकावर बळीराजाचे पूजन केले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी, “इडा पिडा टळून बळीचे राज्य यावे यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे,” असे आवाहन केले. तसेच उपस्थितांना बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बळीराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा बळीराजांचे विचार आणि शेतकऱ्यांसाठीचे योगदान यांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मानले. यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, विक्रांत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डी. एम. पाटील, महेश पाटील, वाल्मीक पाटील, एल. टी. पाटील, सयाजीराव पाटील, विवेक पाटील, मराठा समाज मंडळाचे शेखर पाटील, दत्तू शामराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, संजय पाटील, पवार आप्पा, योगेश शिंदे, भरत बोरसे, बाळू संतोष पाटील आदींसह नागरिक, शेतकरी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *