अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपर पकडला; १२ दिवसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मंडळाधिकारी आणि ग्राममहसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाई केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी तब्बल १२ दिवसांनी ४ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपरसह मुरूम असा एकूण १० लाख ९ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या आदेशानुसार मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे, ग्राममहसूल अधिकारी अशपाक पिंजारी व आदिती जरे हे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कारवाईसाठी जात असताना फरशी पुलाकडून गांधलीपुराकडे जाणारा डंपर क्रमांक एम.एच. १४ सी.पी. ७२७५ मुरूम वाहतूक करताना आढळून आला. पथकाने डंपर अडवून चालकाकडे मुरूम वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अजय विजय वानखेडे, रा. आर्डी असे सांगितले. याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलिस ठाण्यात चालक अजय विजय वानखेडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३(२), ३०५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत. कारवाईत दहा लाख रुपये किमतीचा डंपर आणि ९ हजार ५६ रुपये किमतीचा मुरूम असा एकूण १० लाख ९ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *