
अमळनेरात गुजराती संस्कृतीचा जागर; ‘एनआरजी मीट – डायस्पोरा’ उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) गुजराती भाषा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा वारसा जपत नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याच्या उद्देशाने अमळनेर येथे आयोजित ‘एनआरजी मीट – डायस्पोरा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. गुजरात स्टेट नॉन-रेसिडेंट गुजराती (एनआरजी) फाउंडेशन, गांधीनगर आणि श्री समस्त गुजराती समाज, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. गुजराती समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, चैतन्य संघानी, गुजरात राज्य अनिवासी गुजराती (एनआरजी) फाउंडेशनचे मामलतदार संजय पटेल, अखिल भारतीय गुजराती समाजाचे अध्यक्ष तथा धुळे श्री गुजराती समाजाचे अध्यक्ष संजीव वाणी, चोपडा येथील चंद्रहास गुजराती, मुंबई येथील अनंतरय भोगीलाल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुणभाई गुजराती आणि अनंतरय भोगीलाल मेहता यांनी गुजराती समाजातील एकता, संस्कृतीचे जतन तसेच गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान व त्यांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जगभरातील गुजराती बांधवांना आपल्या मातृभूमीशी आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी गुजरात सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
गांधीनगर येथील एनआरजी फाउंडेशनचे मामलतदार चैतन्य संघानी यांनी उदाहरणांच्या माध्यमातून गुजरातचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, गुजराती भाषा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच एनआरजी फाउंडेशनची स्थापना, अनिवासी गुजरातींच्या हितासाठी आणि कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संदेशाचा उल्लेख करत गुजराती बांधवांनी एकजुटीने राहावे आणि आपली संस्कृती व मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही गुजराती समाजाच्या एकतेबाबत व सांस्कृतिक वारशाच्या जतनाबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा त्यांनी उल्लेख केला. अखिल भारतीय गुजराती समाजाचे अध्यक्ष संजय पटेल यांनीही मनोगत व्यक्त करत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संघटना अधिक बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसह देशभरातील गुजराती बांधवांना एकाच व्यासपीठावर आणण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमात सुरेंद्रनगर येथील ‘साझ म्युझिक’च्या कलाकारांनी संगीत, विनोद आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर केले. सुमधुर संगीत आणि विनोदी सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गुजराती समाजातील ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आलेला सन्मान. समाजाची जडणघडण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री समस्त गुजराती समाज, अमळनेरचे अध्यक्ष प्रेम शहा यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष चेतन गोसालिया, खजिनदार जितेंद्र जेठवा, सचिव प्रतीक खंदेरिया, डॉ. विजय शहा, सुनील शहा (पारोळा), विक्रम जोशी (धरणगाव) तसेच इतर पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. गुजराती भाषा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply