खरीप हंगामासाठी स्मार्ट नियोजनावर भर; आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील तालुका कृषी विभागातर्फे २७ रोजी खरीप हंगामाच्या नियोजनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप निकम, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी स्मार्ट व प्रभावी खरीप नियोजनावर सादरीकरण करताना शेतकऱ्यांना वेळेवर सेवा व संसाधने उपलब्ध करून देणे, उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करणे तसेच शेतीमालाचा खर्च कमी करून नफा वाढविण्यावर भर दिला. आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना उच्च दर्जाचे बियाणे वेळेवर उपलब्ध करून त्याचे योग्य वितरण करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच खत व कीडनाशकांची मुबलक उपलब्धता, जलस्रोतांचा आढावा घेऊन ड्रिप, स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारे जलसंधारणाला प्राधान्य देणे, हवामानानुसार पिकांची निवड करणे व शेतकरी मेळावे आयोजित करण्याचे निर्देश दिले. खरीप हंगामातील पिकांसाठी फेरोमेन ट्रॅप व सापळा पिके याबाबतही चर्चा झाली. शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी डिजिटल नोंदणी वाढविणे, पीएमएफएमई, पीएम किसान व पोखरा योजनांबाबत जनजागृती करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी, कृषी ताई, कृषी सखी तसेच कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *