
पांझरा नदीवर केटीवेअर बंधारे व सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पांझरा नदीवरील मांडळ, मुडी आणि शहापूर परिसरात केटीवेअर बंधारे उभारण्याबाबत तसेच अमळनेर–ढेकू–शिरसाळे–तरवाडे–वावडे–मांडळ ते मुडी या मार्गावरील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट (ट्रिमिक्स) पद्धतीने काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पांझरा नदीवर केटीवेअर बंधारे उभारल्यास पावसाचे पाणी प्रभावीपणे अडविले जाईल. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन परिसरातील शेतकरी, नागरिक तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना मोठा फायदा होईल. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हे बंधारे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच अमळनेर–ढेकू–शिरसाळे–तरवाडे–वावडे–मांडळ ते मुडी या मार्गावरील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट (ट्रिमिक्स) पद्धतीने दर्जेदार बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक व शेतकरी प्रवास करत असल्याने सुरक्षित आणि टिकाऊ रस्त्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील तसेच धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आण्णासाहेब हिलाल माळी उपस्थित होते. निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत प्रस्तावित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या कामांमुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply