अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांची स्वच्छताच नाही!

उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी टाकीत उतरून पाहणी करीत सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या २२ ते २४ वर्षांपासून अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली नसल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व घाण साचली असून यामुळेच शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केला आहे. या आरोपांमुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

प्रशांत निकम यांनी सोमवारी दुपारी कोर्टामागील जीवणज्योती कॉलनी परिसरातील जलकुंभात स्वतः उतरून पाहणी केली. यावेळी टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेली घाण आणि गाळाचे भयावह चित्र त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या पाहणीचे चित्रीकरण मोबाईल कॅमेऱ्यात करून पत्रकारांसमोर सादर केले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रशांत निकम म्हणाले की, शहरातील जलकुंभांची गेल्या २२ ते २४ वर्षांत स्वच्छता झाली नसेल तर आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी नेमके काय केले, हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ रस्ते झाडणे आणि गटारी साफ करणे एवढेच नगरपालिकेचे काम नसून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभांची नियमित स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. या दुर्लक्षामुळेच मागील काळात शहरवासीयांना दूषित पाण्याचा सामना करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

पावसाळ्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबवून शहरातील सर्व जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतकी वर्षे जलकुंभांची स्वच्छता का करण्यात आली नाही, याबाबत मागील सत्ताधाऱ्यांकडे जाब विचारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “सत्ताधारी काय करत आहेत, असा प्रश्न विचारला जातो; मात्र आम्ही मागील चुका दुरुस्त करण्याचे काम करत आहोत. आम्ही जमिनीवर राहून काम करणारी माणसे आहोत, असे ते म्हणाले. जलपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या या दाव्यांमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *