
लिनेस क्लबचा स्तुत्य उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे या उद्देशाने लिनेस क्लबतर्फे येथील प्रताप हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास लिनेस क्लबच्या अध्यक्षा कविता पारख, इन्चार्ज ऑफिसर जास्मिन भरूचा, कॅबिनेट ऑफिसर जया जैन, डॉ. मंजुश्री जैन तसेच शारदा अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कविता पारख यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच भविष्यात शाळेला अधिक शैक्षणिक साहित्याची आवश्यकता भासल्यास लिनेस क्लबतर्फे शक्य ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, शैक्षणिक किट तसेच इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पुस्तके वितरित करण्यात आली. आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार एस. ए. खांजोडकर यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मदतीची गरज
“गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रताप हायस्कूल साठी मदत करावी.” – कविता पारख, अध्यक्षा, लिनेस क्लब

Leave a Reply