चैताली पाटीलची नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड, तेजल पाटीलचीही उल्लेखनीय कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सायारदेवी बोहरा सेंटर स्कूल, अमळनेरच्या विद्यार्थीनी चैताली पाटील आणि तेजल पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. चैताली पाटील हिने आपल्या सामन्यांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यातही प्रभावी कामगिरी करत विजय मिळवल्याने तिची नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात तेजल पाटील हिनेही आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. दोन्ही खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केलेल्या या कामगिरीबद्दल सायारदेवी बोहरा सेंटर स्कूलच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. चैताली पाटील आणि तेजल पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांना नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यातही सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मुख्याध्यापक जितेंद्र सिंग यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *